‘डीजे’चा फैसला पुढच्या बुधवारी -उच्च न्यायालय
By Admin | Published: June 18, 2015 02:40 AM2015-06-18T02:40:49+5:302015-06-18T02:40:49+5:30
सणासुदीला व घरगुती कार्यक्रमांना लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजाबाबत उच्च न्यायालय पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश देणार आहे़
मुंबई: सणासुदीला व घरगुती कार्यक्रमांना लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजाबाबत उच्च न्यायालय पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश देणार आहे़ त्यामुळे डीजेचा आवाज कमी होणार की बंद होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़
उत्सवांदरम्यान मोठ्या अवाजात लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरचा स्थानिकांना त्रास होतो. त्यामुळे याला प्रतिबंंध करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्यातील डॉ़ महेश बेडेकर यांनी दाखल केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये याला प्रतिबंध करणारे धोरण आखण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते़ मात्र हे धोरण आखले नसल्याची माहिती बुधवारी न्या़ अभय ओक व न्या़ रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाला याचिकाकर्त्यांनी दिली़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच धारेवर धरले़ आम्ही उत्सवांच्या विरोधात नाही़ पण नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे़ त्यामुळे कठोर नियम असणे आवश्यकच आहे़ तेव्हा हे धोरण कधी आखले जाणार याचे प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश खंडपीठाने दिले़ यावेळी डी़जे़ च्या आवाजाचाही नागरिकांना खूप त्रास होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने डी़जे़ मध्ये वापरण्यात येणारे स्पीकर व साधनांची माहिती शासनाने द्यावी, असे आदेश देत याबाबत पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश दिले जातील असे स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)