गुन्हे रद्द करण्यास डीएसके हायकोेर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:42 AM2018-01-31T05:42:33+5:302018-01-31T05:48:45+5:30
पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर व मुंबई येथेही गुंतवणूकदारांना फसविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई व कोल्हापूर येथे नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत किंवा ते गुन्हे पुण्याच्या आर्थिक अन्वेषण गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करावेत
मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर व मुंबई येथेही गुंतवणूकदारांना फसविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई व कोल्हापूर येथे नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत किंवा ते गुन्हे पुण्याच्या आर्थिक अन्वेषण
गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करावेत, यासाठी डीएसकेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत विशेष सरकारी वकील अनुपस्थित असल्याने न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
काय म्हटले आहे याचिकेत?
सामान्य माणसांनी डीएसकेंच्या वेगवेगळ्या योजनेत गुंतविलेले पैसे परत करणे डीएसकेंना जमले नाही. त्यामुळे वैतागलेल्या गुंतवणूकदारांनी डीएसकेंविरुद्ध पुणे पोलिसांत तक्रार केली. त्या पाठोपाठ मुंबई व कोल्हापूर येथील गुंतवणूकदारांनीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
मात्र, एकाच गुन्ह्यासाठी सर्व ठिकाणी गुन्हे नोंदविले जाऊ शकत नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला देत, डीएसकेंनी कोल्हापूर व मुंबई येथे नोंद गुन्हे रद्द करावेत किंवा पुणे ईओडब्ल्यूकडे वर्ग करावे, अशी विनंती करणारी याचिका डीएसके यांनी अॅड. घनश्याम उपाध्याय यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
भविष्यात जरी गुंतवणूकदारांनी डीएसकेंविरुद्ध गुन्हे नोंदविले, तरी ते पुणे ईओडब्ल्यूकडे वर्ग करावेत. कारण पुणे ईओडब्ल्यू या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे, तसेच अटकपूर्व जामिनावरील अर्जाची सुनावणी करताना, न्यायालयानेही सर्व गुंतवणूकदारांचा विचार करून ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.