‘डीएमआयसी’ची मदार स्वीडनच्या उद्योगांवर - सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:55 AM2017-10-17T03:55:39+5:302017-10-17T03:57:09+5:30
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटिंग करण्यात आली असून, तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत.
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटिंग करण्यात आली असून, तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत. त्यांच्याशी गेल्या महिन्यात चर्चा केल्यानंतर आशा पल्लवीत झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
सीएमआयएच्या देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रा.लि.च्या भूमिपूजनप्रसंगी ते शेंद्रा येथे बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे भूमिपूजन येथे होत आहे. येथील इको सिस्टीम, दळणवळण, बाजारपेठ, कुशल मनुष्यबळामुळे जगभरातील कंपन्या औरंगाबादचा विचार करतील. व्हेंडर सिस्टीम चांगली असल्याचे मध्यंतरी स्वीडन दौºयामध्ये तेथील उद्योगांना सांगितले. ई-मोबिलिटीचा पुढचा काळ असणार आहे. इलेक्ट्रॉनिक
कार उत्पादनाची यापुढील
बाजारपेठ असणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या स्वीडन दौºयात मराठवाडा आणि औरंगाबादचे मार्केटिंग केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे, संजय केसकर, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, क्लस्टरचे संचालक सुरेश तोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक उद्योगांवर भर हवा
विधानसभा अध्यक्ष बागडे हे सुभाष देसाईंना म्हणाले, येथील औद्योगिक प्लॉट लवकर भरावेत ही अपेक्षा आहे. येथील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने जमिनी दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये पाहिजे तेवढी प्रगती इकडे झालेली नाही. बाहेरच्यांऐवजी स्थानिक उद्योगांवर भर दिला जावा. आंध्र प्रदेशात किया मोटार्स हा उद्योग गेला तरी परत आणावा असे साकडे खा.खैरे यांनी उद्योगमंत्री, विधानसभा अध्यक्षांना घातले.
बजाजनगरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
वाळूज औद्योगिक क्षेत्रात विविध सुविधा पुरविण्यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न सुरू असून, स्मार्ट औद्योगिक क्षेत्र नावारूपास यावे, यासाठी एमआयडीसीकडून भरीव मदत करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री देसाई यांनी बजाजनगरात आयोजित कार्यक्रमात दिले.
बजाजनगरात २७ कोटींचा निधी खर्च करून नागरी वसाहतीतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून, या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार वसाहत
म्हणून ओळखल्या जाणाºया बजाजनगरात एमआयडीसी प्रशासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात येतात. आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; मात्र ते आले नाहीत.