गुंड लहू ढेकणेच्या मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी
By admin | Published: May 18, 2015 03:59 AM2015-05-18T03:59:14+5:302015-05-18T03:59:14+5:30
शरीरावर कोणताही जुना व्रण नसताना कुख्यात गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा मृतदेह त्याच्या भावाने ओळखला कसा? अशी शंका पोलिसांना आहे
कोल्हापूर : शरीरावर कोणताही जुना व्रण नसताना कुख्यात गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा मृतदेह त्याच्या भावाने ओळखला कसा? अशी शंका पोलिसांना आहे. स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्याच व्यक्तीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केलेला असू शकतो. त्यामुळे तो त्याचाच मृतदेह आहे का, हे पडताळण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
डीएनए चाचणीसाठी लहू व त्याचा भाऊ अंकुश या दोघांच्या रक्ताचे नमुने रविवारी सकाळी मुंबई येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेस (फॉरेन्सिक लॅब) पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव यांनी दिली.
गिरगाव (ता. करवीर) येथील गवती डोंगरावर शनिवारी शीर व हातांचे पंजे तोडलेला मृतदेह पोलिसांना आढळला होता. मृतदेहाच्या पँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे पुण्याचा गुंड ढेकणे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याने हा लहूचाच मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले.
ढेकणेच्या हातांचे ठसे पोलीस ठाण्यात सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यावरून मृतदेह नेमका कोणाचा आहे, हे पोलीस सिद्ध करतील. (प्रतिनिधी)