ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर भाविकांच्या महापूजा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 02:38 PM2019-12-27T14:38:10+5:302019-12-27T14:44:06+5:30

माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक

Dnyaneshwar Mauli mahapooja closed for devotee | ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर भाविकांच्या महापूजा बंद 

ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर भाविकांच्या महापूजा बंद 

googlenewsNext
ठळक मुद्देआजपासून अंमलबजावणी : समाधीचे संवर्धन व जपणुकीसाठी घेतला निर्णय; तज्ज्ञांचा अभिप्राय संजीवन समाधीचा ठेवा चिरंतन जपणे, तसेच संवर्धन करणे जबाबदारी व कर्तव्य

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा आहे. त्यामुळे तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. समाधीवरील अभिषेक हा जरी काही मोजक्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय असला, तरी त्यामुळे समाधीची होणारी झीज, तसेच अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीचे स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत होती. यापार्श्वभूमीवर शुक्रवार (दि.२७) अर्थात पौष शुद्ध प्रतिपदेपासून माऊलींच्या समाधीवर कमिटीच्या वतीने दैनंदिन होणारा पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त  अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाºया अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का? याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने १७ सप्टेंबर २०१९ रोजी प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. 
समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीत कमी राखली जावी, असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी १४ नोव्हेंबरला संस्थान कमिटीकडे सादर केला होता. 
  त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन केला. या विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर, जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. मात्र, भाविकांना अभिषेक व महापूजा करता यावी म्हणून यापुढे माऊलींच्या चलपादुकांवर अभिषेक व महापूजा करण्यास संस्थानने अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठी येथील मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली जाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड.विकास ढगे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
.....
समाधीचे संवर्धन करणे महत्त्वाचे 
संजीवन समाधीचा ठेवा चिरंतन जपणे, तसेच संवर्धन करणे हे प्रत्येक भाविकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. मात्र, दिवसेंदिवस माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी, तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अभिषेक करतेवेळी विधी, उपचार व त्याचे पावित्र्य याबाबत मोठ्या प्रमाणात तडजोड केली जाते. 
याबाबत अनेक भाविकांनी संस्थांनकडे प्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. वाढणारे अभिषेक व महापूजा त्याच्याशी संबंधित आर्थिक अनियमिततेचे देखील कारण बनत असल्याचे सह धमार्दाय आयुक्त यांनी नोंदविलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Dnyaneshwar Mauli mahapooja closed for devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.