स्पर्धा स्वत:शी करा, दुसऱ्याशी नको

By admin | Published: February 15, 2017 01:29 AM2017-02-15T01:29:58+5:302017-02-15T01:29:58+5:30

सयाजी शिंदे; ‘शिवोत्सव’च्या समारोपप्रसंगी साधला तरुणाईशी संवाद

Do the competition yourself, not the other | स्पर्धा स्वत:शी करा, दुसऱ्याशी नको

स्पर्धा स्वत:शी करा, दुसऱ्याशी नको

Next


कोल्हापूर : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी स्पर्धा स्वत: शी करा, दुसऱ्याशी नको. खोट्याचा आधार घेऊ नका, नेहमी खरे राहा, असा सल्ला अभिनेते सयाजी शिंदे यांनी मंगळवारी येथे तरुणाईला दिला. शिवाजी विद्यापीठातील ‘शिवोत्सव’ या ३२ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्यांनी मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत देशभरातील तरुणार्इंशी मनमोकळा संवाद साधला.
अभिनेते शिंदे म्हणाले, महाविद्यालयीन जीवन हे एक पायरी असून आयुष्याचा मंच खूप मोठा आहे. करिअर हे महाविद्यालयीन जीवनात पक्के करावे. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास करिअर होणार नाही. अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळावर करिअर घडवा. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘टॅलेंट’च उपयोगी ठरते. आयुष्यात कसे जगायचे ते ठरवा. ध्येय निश्चित करून ते साधण्याच्या दिशेने हळू-हळू वाटचाल करा. युवा महोत्सवात आता महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करत आहात, देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे ध्येय बाळगा.
अभिनेते शिंदे यांनी संवाद साधण्यापूर्वी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य समूहगीत, आय. के. गुजराल युनिव्हर्सिटीच्या गुरुप्रीत सिंग याने नकला सादर केल्या. राजस्थानच्या बनस्थळी युनिव्हर्सिटीच्या संघाने बहारदार लोकनृत्य, तर आंध्र प्रदेशच्या कृष्णा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींनी लोकवाद्यवृंद सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. (प्रतिनिधी)


पुस्तकाने दाखविला करिअरचा मार्ग
एफ.वाय. ते टी.वाय. या कालावधीत वॉचमनची नोकरी करत असतानाच मी अभिनेता व्हायचे ठरविले आणि त्याच दिशेने वाटचाल केली. वयाच्या विसाव्या वर्षी धडपड सुरू केली तेव्हा कुठे चाळीसाव्या वर्षी यश लाभल्याचे त्यांनी सांगितले. दादरच्या फूटपाथवर ‘अभिनय साधना’ हे अवघ्या २२ रुपयांचे पुस्तक आपल्या करिअरला मार्ग दाखविणारे ठरल्याचे अभिनेते शिंदे यांनी सांगितले.


‘टॅलेंट’ कायम
जवळ ठेवा
या महोत्सवातील तरुणाईचा कला सादरीकरणाचा दर्जा उच्चत्तम असल्याचे दिसून आले. महोत्सवातून आठवणी घेवून जा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कायम आपल्याजवळ ‘टॅलेंट’ ठेवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे म्हणाले, आयुष्यात हा महोत्सव म्हणजे एक टप्पा आहे. तेवढ्यावरच समाधान न मानता पुढे वाटचाल करा.
 

Web Title: Do the competition yourself, not the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.