मान्सून असतानाच पीक कर्जवाटप करा
By admin | Published: June 26, 2015 02:19 AM2015-06-26T02:19:14+5:302015-06-26T02:19:14+5:30
मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच,
मुंबई : मान्सून सर्वत्र सुरू असतानाही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुरेसे गाठले गेलेले नाही. त्यामुळे बँकांनी या कर्जवाटपाची वेळ पाळावी. तसेच, गतवर्षी दुष्काळ असलेल्या भागांना प्राधान्याने कर्जवाटप करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची (एसएलबीसी) बैठक बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी सहभागी बँकांना ही सूचना करण्यात आली. बँकांनी प्राधान्य क्षेत्रांसाठी (शेती, उद्योग, शिक्षण, गृह) या आर्थिक वर्षात १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा या बैठकीत मांडण्यात आला. यापैकी ६६ हजार ७४८ कोटींचे कर्ज शेतीशी संबंधित असून त्यातील ४४ हजार ३१९ कोटी पीक कर्ज असणार आहे.
काही मर्यादित शेतकऱ्यांनाच अद्याप पीककर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा वेग वाढवावा, तसेच शेती व ग्रामीण भागातील समस्यांकडे बँकांनी अत्यंत संवेदनशीलपणे पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
पीक कर्जाचे वाटप करताना शेतकरी आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांत प्राधान्य देण्याची सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार उचलण्यासाठी सरकारने तसा फंड उभारावा, असे मत बँकर्स समितीचे अध्यक्ष व बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक सुशील मुनोत यांनी मांडले. या बैठकीला कृषिमंत्री एकनाथ खडसे, तसेच कृषी राज्यमंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते.