' हे ' सर्व पाहिल्यावर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 06:50 PM2020-07-29T18:50:48+5:302020-07-29T19:11:32+5:30
डॉक्टरांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह असून, आमच्यावर शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका.
पुणे: कोरोना विषाणूंच्या उद्रेकात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धमकीवजा भाषा बोलत आहेत. सोशल मीडियावर डॉक्टरांबद्दल शाब्दिक हिंसाचार सुरूच आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का, असा संतप्त सवाल डॉक्टरांच्या संघटनांमधील प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. डॉक्टरांवरील हल्ला हा निषेधार्ह असून, आमच्यावर शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
लातूर येथे एका डॉक्टरांवर प्राणघातक हल्ल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत केली. आँनलाईन आयोजित केलेल्या या परिषदेत डॉ. मंगेश पाटे, डॉ. सुहास पिंगळे आणि आयएमएच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी उपस्थित होते. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. रुग्णालयातील कर्मचारी सोडून गेले आहेत. कमी मनुष्यबळावर खासगी डॉक्टर सरकारी आरोग्य व्यवस्थेला मदत करीत आहेत, अशा शब्दात लातूर येथील डॉक्टरांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
डॉ. भोंडवे म्हणाले, “कोरोनाविरोधातील राज्यातील डॉक्टर प्राणपणाने लढत आहे. प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत. मात्र, लातूरमधील डॉक्टरांवरील हल्ल्याने या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात अशा प्रकारेच हिंसाचाराच्या घटना होत आहेत. पण, राज्यातील प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही. मुंबईत दमदाटी करून रुग्णालयांचे बील कमी करून घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर खूप जास्त बिल लावतात. ते रुग्णांना लुबाडतात, हे एककल्ली आहे. त्यात डॉक्टरांनी, रुग्णालयांची बाजू समजून घेतली जात नाही. वस्तूस्थिती अशी आहे की, खासगी रुग्णालयांना सरकारने दिलेले दर न परवडणारे आहेत. हे दर वस्तूनिष्ठ नाहीत. व्हेंटीलेटर, आँक्सिजन, पीपीई किट, जैव कचरा या सगळ्या खर्चात वाढ झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱयांचा खर्च वाढला आहे. अशा स्थितीत डॉक्टर काम करत आहे. पण, सरकार, मंत्र्यांकडून वारंवार रुग्णालय डॉक्टरांना लुटतात, असे सांगितले जाते.”
डॉ. पाटे यांनी लातूरसारख्या भागांमध्ये रुग्णालयात काम करताना डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. रुग्णालयात पीपीई किटपासून ते औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे तरी याही परिस्थितीत डॉकटर आपले कर्तव्य जीव धोक्यात घालून पार पाडत आहेत. कोरोना उद्रेकात कठिण काळात रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.” समाजाने याचा विचार केला पाहिजे.
डॉ. पिंगळे म्हणाले, “सरकार आणि विविध पक्षांचे नेते पहिल्या दिवसापासून डॉक्टरांशी धमकीवजा भाषेत बोलत आहेत. त्यामुळे डॉक्टरांबद्दल आकस आणि द्वेष निर्माण झाला आहे.”