मागाठाणे मतदारसंघात दमदार कामगिरी करू - प्रकाश सुर्वे

By admin | Published: January 19, 2017 02:33 AM2017-01-19T02:33:38+5:302017-01-19T02:33:38+5:30

येत्या पालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना दमदार कामगिरी करेल

Do good work in Magathane constituency - Prakash Surve | मागाठाणे मतदारसंघात दमदार कामगिरी करू - प्रकाश सुर्वे

मागाठाणे मतदारसंघात दमदार कामगिरी करू - प्रकाश सुर्वे

Next

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- येत्या पालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना दमदार कामगिरी करेल, असा विश्वास स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला. माझ्या मतदारसंघात एकूण ७ नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही मुसंडी मारत किमान ६ तरी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू. तसेच शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ मध्ये २० पैकी शिवसेनेचे १२-१३ नगरसेवक निवडून येतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत बोलताना आमदार सुर्वे यांनी महापालिका निवडणुकीसह मागाठाणे विधानसभा मतदारसंघात २७ महिने आमदार म्हणून केलेल्या कामगिरीचाही आढावा घेतला.
आमदार सुर्वे म्हणाले की, माझ्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि संध्या विपुल दोशी, आर (दक्षिण) विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक
योगेश भोईर, मनसेचे सरचिटणीस संजय घाडी आणि उपाध्यक्ष संजना घाडी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीत शिवबंधन बांधून शिवसेनेत
जाहीर प्रवेश केला. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गापासून गेली ५० वर्षे अरुंद असलेला दुबे कंपाउंडचा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. यासाठी सातत्याने पालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून या रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले आहे. आरे कॉलनी मुंबईचे फुप्फुस असल्याने तेथील झाडांच्या कत्तलीस तसेच मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा विरोधच आहे. परिसरातील वाहतूककोंडीवर उतारा म्हणून मेट्रोऐवजी कोस्टल रोड प्रकल्प राबवायला हवा, असेही ते म्हणाले.
दहिसरच्या कैलासनगर येथील डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे लांबून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे प्रभाग क्र. ४चे नगरसेवक उदेश पाटेकर यांच्यासह सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बुस्टरने पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केल्यामुळे येथील सुमारे ५००० नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील मोकळ्या जागेत महिलांसाठी पंचतारांकित सुसज्ज वातानुकूलित शौचालयांसाठी ६० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच वैशालीनगर येथील खदानच्या जागेवर नैसर्गिक तलाव सुशोभीकरण व उद्याननिर्मितीसाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ७ कोटी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या २७ महिन्यांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख झाडे लावून त्यांचे संवर्धन करणेही सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या १५ लाखांच्या निधीतून पुलाखालून श्रीकृष्णनगरच्या दिशेने नवीन रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. अलियावर जंग मार्ग, देवीपाडा नाका येथे पंचतारांकित वातानुकूलित अद्ययावत शौचालयांची निर्मितीही केली आहे. सुमारे २५० गरुजू नागरिकांना मोतीबिंदू आणि अन्य शास्त्रक्रियेसाठी विविध अशासकीय ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. तर दर महिन्याला १० ज्येष्ठ नागरिकांचे मोफत मोतीबिंदू आॅपरेशन करून देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कांदिवली (पूर्व) येथील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीतील पीडितांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये अधिक ३८०० रुपये अर्थसाहाय्य शासनाकडून मिळवून दिले. येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन येथील २७ एकर भीमनगर येथील गोरक्ष जागेत किंवा केतकीपाडा येथील शेख खदानच्या ३२ एकर मोकळ्या भूखंडावर केले पाहिजे, असेही सुर्वे म्हणाले.
>संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे अंतर घोडबंदर रोडमार्गे पार करण्यासाठी सध्या ५० मिनिटे ते एक तास लागतो. हे अंतर १० मिनिटांत पार करणारा प्रस्तावित भुयारी मार्ग भविष्यात साकारणार आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींचा निधी दिल्याचेही ते म्हणाले. नॅन्सी एसटी डेपोचेही
रूपडे पालटणार असून राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

Web Title: Do good work in Magathane constituency - Prakash Surve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.