"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:12 IST2025-03-02T18:11:24+5:302025-03-02T18:12:20+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनात केली विशेष विनंती

Do more research on folk art and drama, Maharashtra government will provide all kinds of help said Ashish Shelar | "या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापूर्वी लोककलांमधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचा समारोप आज मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात संपन्न झाला.

"आपले मराठी नाटक हे शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेले आहे. विष्णुदास भावे यांनी नाटकाचा रंगमंचावरील पहिला अविष्कार सादर केला यात काही दुमत नाही. पण आता नवनवीन माहिती समोर येत असून लोककलांमध्ये नाटकाची मुळे आहेत असे लेखन समोर येते आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यास गट नाट्य परिषदेने स्थापन करुन याबाबत संशोधन करावे सरकार या कामी पूर्ण मदत करेल", असे आश्वासन शेलार यांनी सरकारच्या वतीने दिले.

"नाट्य परिषदेने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषांमधील नाटकांचा महोत्सव आयोजित केला. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून विविध भाषांमधील विचार, नाटक, काव्य, कथा आणि त्यातील सांस्कृतिक विविधता याचे अदान प्रदान होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही नेहमीच अन्य भाषेतील शब्द सामावून घेतच आली आहे. तसेच मराठी भाषेतील अनेक शब्द अन्य भाषांनी ही लिलया सामावून घेतले आहेत," याचाही त्यांनी उल्लेख केला.

दरम्यान, समारोपप्रसंगी नाट्य जागर मधील विजेत्या तीन विशेष एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष शेलार आणि सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.

Web Title: Do more research on folk art and drama, Maharashtra government will provide all kinds of help said Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.