स्कूलबसेसना परवानगी देऊ नका - हायकोर्ट
By admin | Published: May 11, 2017 03:09 AM2017-05-11T03:09:50+5:302017-05-11T03:09:57+5:30
खासगी स्कूलबस मालकांनी शाळांबरोबर करार केला असेल, तरच त्या स्कूलबसेसना परवानगी द्या, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी स्कूलबस मालकांनी शाळांबरोबर करार केला असेल, तरच त्या स्कूलबसेसना परवानगी द्या, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने परिवहन विभागाला दिले आहेत. या आदेशामुळे खासगी स्कूलबसेसव्यतिरिक्त रिक्षा, बेस्ट, व्हॅन आदी वाहनांना शाळांबरोबर करार करावा लागणार आहे. या आदेशाचे पालन यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच करावे लागणार आहे.
महाराष्ट्र वाहने (शाळा बसेस नियमित करण्याबाबत) नियम, २०११चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने पीटीए युनायटेड फोरमने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने संबंधित विभागाला याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले, तसेच ज्यांनी शाळेबरोबर करार केला नाही, अशा बसेस शाळेच्या मुलांना ने-आण करणार नाहीत, याची काळजी घेण्याचेही निर्देश न्यायालयाने परिवहन विभागाला दिले.
खासगी बसेसना, व्हॅन किंवा रिक्षांना परवाना देताना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याकडे दुर्लक्ष केले जाते. मुलांचा जीव धोक्यात घालण्यात येतो. त्यामुळे नियमांचे पालन करण्यात यावे, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.