तूरखरेदी केंद्रांवर जात विचारू नका, सभापतींनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:51 IST2020-02-28T05:37:05+5:302020-02-28T06:51:17+5:30
यापुढे कोणत्याही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना जात विचारली जाऊ नये, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

तूरखरेदी केंद्रांवर जात विचारू नका, सभापतींनी दिले निर्देश
मुंबई : नाफेडच्या तूरखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा गुरुवारी विधान परिषदेत चांगलाच गाजला. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन यापुढे कोणत्याही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना जात विचारली जाऊ नये, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
तूरखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप सदस्य सुजीतसिंह ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा प्रकार निंदनीय असल्याचे ते म्हणाले. त्यावर दिवाकर रावते यांनी नाफेड ही केंद्र सरकारची यंत्रणा असून तेथे होणाऱ्या प्रकारांसाठी राज्य सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असे स्पष्ट केले.
त्यावर शेकापचे जयंत पाटील यांनी नाफेड ही केंद्राची यंत्रणा असली तरी तिची अंमलबजावणी राज्य सरकारकडूनच केली जात असल्याचे निदर्शनास आणले. या विषयावरील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत, यापुढे कोणालाही जात विचारली जाऊ नये, असे निर्देश सभापतींनी दिले.