शेतकऱ्यांना वेठीस धरू नका
By admin | Published: June 6, 2017 05:37 AM2017-06-06T05:37:49+5:302017-06-06T05:37:49+5:30
आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतक-यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतक-यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत. अशाप्रकारे शेतक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असणा-या विरोधकांना शेतकरीच त्यांची खरी जागा दाखवून देतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांचा समाचार घेतला.
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या नव्या शीतपेयाचे अनावरण सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतल्यानंतरही शेतक-यांनाच वेठीस धरण्याचे पाप विरोधक करत आहेत , असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतक-याला योग्य भाव आणि बाजार मिळणे विविध परिस्थितीवर अवलंबून असते. अशा बेभरवशाच्या बाजारातून शेतक-याची सुटका करायची असेल तर प्रक्रीया उद्योगावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगांसाठीचे धोरणही बनविले आहे. फलोत्पादन आणि प्रक्रीयाउद्योग हेच शेतक-यांचा प्रश्नांचे उत्तर असून त्यासाठी राज्य सरकारने प्रक्रीया उद्योगांची उभारणी, गोदाम, शीतगृहांच्या बांधणीचे काम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.