मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही- अॅड. प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:39 AM2018-10-03T09:39:56+5:302018-10-03T09:40:14+5:30
मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत, तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे.
औरंगाबाद : मालकांसारखे वागू नका, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत, तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वत: खात नाहीत; पण दुसऱ्याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतक-यांना हमीभाव दिला जात नाही. त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. ८ दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही, तर नव्याने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथील सभेत दिला.
शेतक-यांना कितीही दिले, तरी महाराष्ट्रातील शेतकरी सारखा रडतच असतो, या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जबिंदा मैदानावर मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला भर उन्हातही मोठी गर्दी झाली होती. मैदानाच्या लगतचे दोन्ही बाजूंचे रस्ते, उड्डाणपूल, इमारतींवरही नागरिकांनी गर्दी केली होती.
>‘संविधान हाक देतेय’
‘एमआयएम’चे नेते खा. ओवेसी म्हणाले, आंबेडकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवापाड परिश्रम घेऊ. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर हे महाराष्ट्रात जेथे जातील, तेथे त्यांच्या पाठीशी ‘एमआयएम’ खंबीरपणे उभी राहील. आपले प्रश्न एक आहेत. आपल्या समस्या सारख्याच आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना एकत्र येऊन या देशातील चित्र बदलण्यासाठी संविधान हाक देत आहे.