शेतक-यांना कर्जमाफीची भीक नको, रोगाचा मूळ उपचार करा!

By admin | Published: September 24, 2015 01:15 AM2015-09-24T01:15:25+5:302015-09-24T01:15:25+5:30

सदाभाऊ खोत यांचे सरकारला आवाहन.

Do not beg! Do not be indebted to farmers, treat the disease first! | शेतक-यांना कर्जमाफीची भीक नको, रोगाचा मूळ उपचार करा!

शेतक-यांना कर्जमाफीची भीक नको, रोगाचा मूळ उपचार करा!

Next

अकोला- शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हा उपचार नाही. यापूर्वीच्या कर्जमाफीतून कोणता हेतू साध्य झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची भीक टाकून मलमपट्टी केल्यापेक्षा रोगाचा मूळ उपचार सरकारने करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केले. वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता लांडगे या सुशिक्षित शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्राने सरकारचे आता तरी डोळे उघडावे. नैराश्यात ढकलल्या जात असलेल्या शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसोबतच तातडीच्या उपाययोजनांवरही सरकारने भर दिला पाहिजे, असे खोत म्हणाले. शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी सरकार पोहोचले नाही. वरवरची मलमपट्टीच करणे सुरू आहे. जोपर्यंत शेतीवर आधारित अर्थव्यवस्था बळकट होत नाही, तोपर्यंंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाही. कर्ज वितरणाची व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. शेतीपुरक व्यवसाय उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी योजना आखताना विदर्भातील शेती व शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचा स्वतंत्र विचार होणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध उद्योजक एकनाथ दुधे यांची उपस्थिती होती.

विजेचा प्रश्न गंभीर

विदर्भातील शेतकर्‍यांसाठी वीज जोडणी न मिळणे हा मोठा प्रश्न आहे. दत्ता लांडगे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी याच कारणामुळे जीवनयात्रा संपविली. पाणी असूनही केवळ वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकरी निराश होत आहेत. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात फिरताना ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे हा प्रश्न येथे गंभीर स्वरूप धारण करीत असून, तो तातडीने सोडविला गेला पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

'शरद पवार पिकनिकवर'

दहा वर्षे राज्य आणि केंद्रात सत्तेत असल्यानंतरही शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान जागृत करता न आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आता राज्यात फिरण्याची वेळ आली आहे. दहा वर्षांंत शेतकर्‍यांसाठी आणि विशेषत: विदर्भातील शेतकर्‍यांसाठी काम केले असते, तर शरद पवारांवर आज फिरण्याची वेळ आली नसती. शेतकर्‍यांचा कळवळा आहे म्हणून ते फिरत नाही, तर सत्तेबाहेर फेकल्या गेल्यामुळे वेळ घालविण्यासाठी ते पिकनिकवर निघाले असल्याचा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी मारला. ७0 हजार कोटी खर्च करून एक टक्काही सिंचन न करता आलेले काका-पुतणे आता पापाचे प्रायश्‍चित्त करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Web Title: Do not beg! Do not be indebted to farmers, treat the disease first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.