संप फोडण्याच्या नादात शेतक-यांच्या जीवनाचा तमाशा होईल असे वागू नका - उद्धव ठाकरे

By Admin | Published: June 5, 2017 07:43 AM2017-06-05T07:43:28+5:302017-06-05T07:45:46+5:30

ऑक्टोबरपर्यंत एका जरी शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी सरकारला प्रायश्चित्त घ्यावे लागेल असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे

Do not behave as a spectacle of farmers' life - Uddhav Thackeray | संप फोडण्याच्या नादात शेतक-यांच्या जीवनाचा तमाशा होईल असे वागू नका - उद्धव ठाकरे

संप फोडण्याच्या नादात शेतक-यांच्या जीवनाचा तमाशा होईल असे वागू नका - उद्धव ठाकरे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भ्रष्ट पैशाने निवडणुका लढवणारे जेव्हा आंदोलनकारी शेतकरी दुधाची, भाज्यांची नासाडी करीत आहेत यावर नक्राश्रू ढाळतात हा मोठाच विनोद आहे. हे विनोद आता थांबवा, शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचे पाप थांबवा! संपाबाबत नक्की काय सुरू आहे, असा संभ्रम शेतकरी आणि जनतेत निर्माण करू नका. संप फोडण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या जीवनाचा तमाशा होईल असे वागू नका. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आता सरकार म्हणून कसोशीने पूर्ण करण्याचे कर्तव्य पार पाडा. ऑक्टोबरपर्यंत एका जरी शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी सरकारला प्रायश्चित्त घ्यावे लागेल असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे. 
 
संप मागे घेत असल्याची घोषणा शेतक-यांच्या काही नेत्यांनी केली आहे, पण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना हा निर्णय मान्य नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत संभ्रम आणि संशयाचे वातावरण निर्माण करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. संप फोडण्याचा प्रयत्न हे यश नसून राज्यकर्त्यांचे अपयश आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असत्या तर देशातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाची फुले उधळली असती, पण शेतकरी आंदोलनातील काही सरकारी सदाभाऊंना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या एकजुटीस भोक पाडण्याचे कार्य सरकारने तडीस नेले आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  
 
मराठा क्रांती मोर्चात फूट पाडून त्या आंदोलनाचा कचरा केला. आता शेतकरी आंदोलनाच्या बाबतीतही ‘फोडा, झोडा’ याच नीतीचा अवलंब झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. ती मिळाली असेल तर शेतकऱ्यांनी सरळ आंदोलन गुंडाळावे या मताचे आम्ही आहोत. शेतमालास हमीभाव आणि दुधास वाढीव दराची मागणी मान्य झाली असेल तर आंदोलनकारी शेतकऱ्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या चरणांचे तीर्थ प्राशन करावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या असतील तर आंदोलनकारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागून विषय संपवून टाकावा. मात्र यापैकी एक तरी मागणी मान्य झाली आहे काय? याचे उत्तर वर्षा बंगल्यावर ‘पहाट’ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना द्यावेच लागेल असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.  
 
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या तोंडास पाने पुसली आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे त्यांनी म्हटले असून त्यासाठी ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितली आहे. राज्यातील ३५ ते ४० लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होईल असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. मात्र विदर्भ-मराठवाड्यातील दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या निर्णयापासून वंचित राहावे लागेल, या आक्षेपावर मुख्यमंत्र्यांचे काय उत्तर आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
वस्तुस्थिती ही आहे की राज्यातील सगळाच शेतकरी कर्जात बुडाला आहे व सातबारा कोरा करणे हाच त्यावरचा उपाय आहे. ते होणार नसेल तर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले? हमीभावासाठी कायदा करण्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा प्रकार म्हणजे जुन्याच आश्वासनांना रंगसफेती करण्यासारखा आहे. राज्य सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. आधी शेतकऱ्यांना घरी बोलावले, मग त्यांचा अपमान केला आणि वर  हाती भोपळा दिला. या भोपळ्याची मिठाई बनवून शेतकऱ्यांचे जे नेते नाचत आहेत त्यांनी त्यांच्या बांधवांशी बेइमानी केली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
अजित नवले या शेतकरी नेत्याने सांगितले आहे की, ‘शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ फितूर झाले. आता फितुरांचे कोणी ऐकणार नाही.’ नवले म्हणाले तसेच वातावरण रविवारी महाराष्ट्रात सर्वत्र दिसले. फितुरांचे नेतृत्व झुगारून शेतकरी पुन्हा लढण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकरी अधिकच स्फोटक आणि खतरनाक झाला आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 
 
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शेतकऱ्यांचा अजिबात विश्वास नाही आणि त्यांचा संपाचा निर्धार कायम आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली ती सकारात्मक होती आणि शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य झाल्या असे ओरडून सांगणारे एकमेव नेते आज आहेत, त्यांचे नाव जयाजी सूर्यवंशी आहे. जयाजी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने आहेत की शेतकऱ्यांच्या बाजूने? कारण शिष्टमंडळातील इतर सर्व नेत्यांची भूमिका जयाजी यांच्यापेक्षा वेगळी आहे. धनंजय जाधव, गिडे, नवले असे नेते शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ठाम असताना जयाजी संप मिटल्याचा कोंबडा आरवत फिरत आहेत. जयाजी यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणूनच वावरले पाहिजे. शेतकऱ्यांचा संप फोडून मुख्यमंत्र्यांना तात्पुरती सत्ता टिकवण्याची हमी मिळाली, पण शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळणार आहे काय? सदाभाऊ खोतांचे मंत्रीपद टिकेल, पण शेतकऱ्यांच्या विझलेल्या चुलींतून धूर निघणार आहे काय? असे सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
 

Web Title: Do not behave as a spectacle of farmers' life - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.