पीडित, तक्रारदाराची निंदा करू नका - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:32 AM2017-10-22T04:32:03+5:302017-10-22T04:32:32+5:30
तपास करत असताना संबंधित तक्रारदार किंवा पीडित व्यक्तीची त्याच्या चारित्र्यावरून निंदा करण्यापासून पोलिसांनी स्वत:ला परावृत्त करावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने पोलिसांना केली आहे.
मुंबई : तपास करत असताना संबंधित तक्रारदार किंवा पीडित व्यक्तीची त्याच्या चारित्र्यावरून निंदा करण्यापासून पोलिसांनी स्वत:ला परावृत्त करावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने पोलिसांना केली आहे.
पोलिसांनी त्यांच्या कृत्यामुळे नागरिकांच्या सन्मान व प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, इतकी संवेदनशीलता व समज दाखवावी, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका याचिकेवर आदेश देताना म्हटले.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तिचा भाऊ आॅक्टोबर २०१५ पासून गायब आहे. तो कस्टम हाउस एजंट होता. पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली. मात्र त्याला शोधून काढण्यास पोलिसांना अपयश आले. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
संबंधित व्यक्तीला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. त्याशिवाय पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, अशी माहिती पायधुनी पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला.
मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने काहीही तपास केला नसल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्याचा भाऊ स्वत:च्या मर्जीने घर सोडून गेला असावा. ‘याचिकाकर्त्याचा भाऊ अल्कोहोलच्या अधीन झालेला होता. त्याच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने तो सतत दु:खी होता. त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्याचे कुटुंबीयांबरोबर सतत वाद होत होते. वारंवार होणाºया वादामुळे व मुलाच्या मृत्यूमुळे याचिकाकर्त्याच्या भावाने घर व कंपनी सोडली असावी. तो स्वत:ला लपवत असावा,’ अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तर न्यायालयानेही पोलिसांनी असे गृहीत धरून तपास करू नये, असे म्हटले.