तोडण्याचे नाही, जोडण्याचे काम करा
By admin | Published: January 4, 2016 01:07 AM2016-01-04T01:07:10+5:302016-01-04T01:11:36+5:30
मौलाना सज्जाद नोमानी यांचे आवाहन : घटनाविरोधी शक्तींना रोखण्याचा जाहीर विचार मंथन मेळाव्यात निर्धार
कोल्हापूर : धर्मनिरपेक्षतेचा गाभा असलेल्या भारतीय राज्यघटनेत बदल करून देशाची एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न घटनाविरोधी शक्तींकडून सुरू आहे. अशा स्थितीत बहुजन समाजातील सर्व घटकांनी आपआपसांतील मतभेद, वाद थांबवावेत. शिवाय एकी तोडण्याऐवजी एकमेकांना जोडण्याचे काम करावे, असे आवाहन आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी रविवारी येथे केले.
सेव्ह फेथ अॅण्ड कॉन्स्टिट्यूशन मूव्हमेंटअंतर्गत आयोजित पश्चिम महाराष्ट्राच्या जाहीर विचार मंथन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना वली रहमानी, तर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, पर्सनल लॉ बोर्डचे संयोजक मौलाना उमरैन रहमानी प्रमुख उपस्थित होते. येथील शेंडा पार्कच्या मैदानावर आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, भारत मुक्ती मोर्चा, कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स् आॅफ इंडिया, विश्व लिंगायत महासभा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटरने या मेळाव्याचे आयोजन केले. यात घटनाविरोधी शक्तींना रोखण्याचा निर्धार करण्यात आला.
मौलाना नोमानी म्हणाले, सध्याचे सरकार उघडपणे घटनेतील बदलाचे काम करीत आहे. त्यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येणार आहे. ते लक्षात घेऊन संविधानातील तत्त्वांनुसार कार्यरत असलेले धर्म संस्था, संघटनांनी मुस्लिम पर्सनल लॉच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन त्याद्वारे सेव्ह फेथ अॅण्ड कॉन्स्टिट्यूशन मूव्हमेंट कार्यान्वित केली. या चळवळीद्वारे घटनाविरोधी शक्तींना रोखण्यासह घटनेबाबत जागृतीचे काम सुरू आहे. सूर्यनमस्कार, योगा आणि शिक्षणात गीतेचा समावेश याच्या सक्तीला आमचा विरोध आहे. घटनाविरोधी शक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाजाने संघटित व्हावे. मुस्लिम समाजाने चुकीच्या प्रथा बंद कराव्यात. शिवाय चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊन कार्यरत रहावे.
मेश्राम म्हणाले, संविधानाला बगल देऊन देशाचा कारभार चालविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायासमोर संकट निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासाठी उभारलेल्या चळवळीला बहुजन समाजाने बळ द्यावे.
मौलाना उमरैन रहमानी म्हणाले, सूर्यनमस्कार, योगा, वंदेमातरम्ची सक्ती करणे हे घटनाविरोधी आहे. या सक्तीला आमचा विरोध राहील. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, विरक्त मठाचे कोरणेश्वर महास्वामी, रेव्हरंड जगन्नाथ हिरवे, डॉ. रफीक सय्यद, मौलाना गुलाम गौस बंदानवाजी, सय्यद गुलाम हुसेन अबेदी, महाथेरो यश कश्यपायन, बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटरचे राष्ट्रीय संयोजक बी. एन. हस्ते, नगरसेवक भूपाल शेटे, आदी प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, एस. सी., ओबीसी अशा सुमारे ५० हजारांहून अधिक बांधवांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात शेंडा पार्कच्या मैदानावर रविवारी सेव्ह फेथ अॅण्ड कॉन्स्टिट्यूशन मूव्हमेंटअंतर्गत आयोजित पश्चिम महाराष्ट्राचा जाहीर विचार मंथन मेळावा झाला. यावेळी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी मार्गदर्शन केले. शेजारी बोर्डाचे जनरल सेक्रेटरी वली रहमानी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समुदायामधील बुद्धिजिवी वर्गाची सामाजिक जबाबदारी व कर्तव्ये या परिसंवादात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. शेजारी डावीकडून मौलाना मोहम्मद उमरैन महेफूज रहमानी, मौलाना सज्जाद नोमाणी, मौलाना वली रहमानी, मौलाना महेफुजूर्रहमान फारुकी, आदी उपस्थित होते.
कोण, काय म्हणाले?
श्रीमंत कोकाटे : लोकशाही व घटना वाचविण्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदी समाजबांधवांनी संघटितपणे कार्यरत राहावे.
जगन्नाथ हिरवे : अल्पसंख्याकांवर धर्माकडून नव्हे, तर घटनाविरोधी विघातक शक्तींकडून हल्ले होत आहेत. या शक्तींना थोपविण्यासाठी बहुजन समाजाचे संघटन महत्त्वाचे आहे.
महाथेरो यश कश्यपायन : सध्या निर्माण झालेल्या सर्व समस्यांचे उत्तर संविधानात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी एकत्रिपणे प्रयत्न
करूया.
डॉ. रफीक पारनेकर : धर्म, घटना वाचविण्यासाठी मजबूत संघटनेची गरज आहे.
कोरणेश्वर महास्वामी : मराठा, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन असे आपण देशातील मूलनिवासी असून, मनुवादी शक्ती परकीय आहेत. या शक्तींच्या हल्ल्यातून माणुसकी, संविधान वाचविण्यासाठी आपण एकजुटीने कार्यरत राहणे आवश्यक आहे.
एकत्रित नमाज पठण...
या कार्यक्रमाच्या ठिकाणी सायंकाळी मुस्लिम समाजातील शिया, सुन्नी, अहले हदीस अशा विविध पंथांतील बांधवांनी एकत्रितपणे नमाज पठण करून एकात्मतेचे दर्शन घडविले.