शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:49 AM2019-12-09T03:49:12+5:302019-12-09T06:05:38+5:30
निष्कारण वादविवाद न करण्याचे इतिहास संशोधक, शिवप्रेमींचेही मत
कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण फार विचारपूर्वक करण्यात आले आहे. ५० वर्षांपासून हे नाव रूढ झाले आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख लघुरूपातच (शॉर्ट फॉर्म) होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार नकोच, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह इतिहास संशोधक, शिवप्रेमींनी रविवारी व्यक्त केले.या विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना शनिवारी केली आहे.
त्याबाबत पाटील म्हणाले, त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विद्यापीठाच्या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख असावा, असे आमचे मत होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा केली. त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण करण्यामागील भूमिका स्पष्ट केली, ती योग्य वाटल्याने आम्ही विरोध टाळून त्यांना सहकार्य केले.आता नामकरण झाल्यास आरपीसी (बेळगावचे राणी पार्वतीदेवी कॉलेज), मुंबईतील सीएसटी, व्ही. टी. बडोद्याची एम. एस. युनिव्हर्सिटी, आदींप्रमाणे या विद्यापीठाचादेखील लघुरूपातच उल्लेख होण्याचा, मूळ नाव बाजूला पडण्याचा धोका आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, नामविस्ताराबाबत सध्या जे नव्याने सुरू झाले आहे ते बरोबर नाही. स्थापनेवेळी सर्वांकष चर्चा करूनच नामकरण केले होते. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख ‘शिवाजी’ या नावानेच आहे. याचा अर्थ त्यांच्याबद्दल आदर नाही, असा होत नाही.
मुख्यमंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडणार
आम्ही याबाबतची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहोत. ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नाव कायम ठेवण्याची मागणी करणार आहोत. या प्रश्नी कोणीही भावनिक होऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
‘श्री शिवाजी मेमोरियल’ असा उल्लेख
गेल्या आठवड्यात खासदार संभाजीराजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा नामविस्तार करण्याची मागणी केली होती. मात्र, खासदार संभाजीराजे कार्यरत असणाऱ्या पुणे येथील एका संस्थेचे नाव ‘आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ असेच आहे.