‘झीरो बॅलन्स’वर दंड आकारू नका
By admin | Published: May 12, 2016 04:32 AM2016-05-12T04:32:13+5:302016-05-12T04:32:13+5:30
जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
मुंबई : जी बचत खाती ‘शून्य बॅलन्स’ घटकातील आहेत, त्या खात्यात पैसे नसल्याच्या कारणावरून बँकांनी संबंधित खातेदारावर दंड आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. बँकेतील खाती आणि पर्यायाने व्यवहार वाढावेत, याकरिता अनेक सरकारी, खासगी, परदेशी बँका विविध कंपन्यांनी करारबद्ध होत एकगठ्ठा बँकेत तेथील कर्मचाऱ्यांची खाती सुरू करतात. ही खाती सुरू करताना त्यात बँकेतर्फे ज्या सुविधांचे आश्वासन दिले जाते़ त्यातील पहिली सुविधा म्हणून ‘शून्य बॅलन्स’ अशा पद्धतीची ही खाती असतील, असे सांगितले जाते.
याचा अर्थ, या खात्यात एकही पैसा राखला नाही, तर ते खाते सुरू राहील. बहुतांश वेळा कर्मचारी ज्या वेळी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारतो व नव्या नोकरीत नवे खाते सुरू करतो, त्या वेळी पहिल्या खात्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्यात अपेक्षित बॅलन्स राखला जात नाही.
त्यामुळे बँका निगेटिव्ह बॅलन्स दाखवत तेवढी रक्कम ही दंड म्हणून ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. मात्र, असे पैसे वसूल करणे गैर असून, बँकांनी हे तातडीने थांबवावे, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत, तसेच (प्रतिनिधी)
दंड झाल्याचे ग्राहकांनी बँकांच्या निदर्शनास आणून दिले आणि तरीही जर बँकांनी दाद दिली नाही, तर ग्राहकाने बँकिंग लोकपालाकडे या संदर्भात दाद मागावी, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही ग्राहकाकडून अशी वसुली होत नसल्याचा दावा बँकांनी केला आहे.