प्रामाणिकतेशी तडजोड करू नका!

By admin | Published: August 27, 2015 02:01 AM2015-08-27T02:01:44+5:302015-08-27T02:01:44+5:30

अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा.

Do not compromise honesty! | प्रामाणिकतेशी तडजोड करू नका!

प्रामाणिकतेशी तडजोड करू नका!

Next

एन. गोपालस्वामी : यूपीएससीतील यशवंतांचा गौरव

पुणे : अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा. त्यासाठी प्रामाणिकतेशी तडजोड करू नका, असे आवाहन माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी यशवंतांना केले.
एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ‘लोकमत’च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव बुधवारी करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या परीक्षेत प्रथम आलेली इरा सिंघल, द्वितीय रेणू राज आणि तृतीय निधी गुप्ता यांच्यासह विविध यशवंतांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, खासदार डॉ. तरुण विजय, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता प्रा. राहुल कराड, एमआयटी स्कूल आॅफ बिझनेसचे संचालक ग्रुप कॅप्टन (निवृत्त) डी. पी. आपटे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रमुख एस. बी. धर्मपात्रे आदी उपस्थित होते. गोपालस्वामी म्हणाले, लोकप्रतिनिधींना समस्यांची जाणीव असते. त्याचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ व एमआयटीचा उपक्रम कौतुकास्पद
यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या परीक्षेतील टॉपरना एकत्रित आणण्याचा ‘लोकमत’ व एमआयटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशी भावना इरा सिंघल, डॉ. रेणू राज व निधी गुप्ता यांनी या वेळी व्यक्त केली.

पंतप्रधान साहाय्यता निधीला ५१ हजार रुपये
गौरव सोहळ्यादरम्यान देण्यात आलेली ५१ हजार रुपयांची रक्कम इरा सिंघल यांनी पंतप्रधान साहाय्यता निधीला देण्याचे या वेळी जाहीर केले.

लष्कर व प्रशासनात
संवाद हवा
लष्कर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कामाची पद्धत, त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. युद्ध किंवा इतर महत्त्वाच्या घटनांमध्ये लष्कर व प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केल्यास ते खूप परिणामकारक ठरेल; पण सध्या असे होत नाही, अशी खंत व्ही. पी. मलिक यांनी व्यक्त केली.

देशात काही लोकांकडे खूप पैसा आहे, तर दुसरीकडे गरिबी ही मोठी समस्या आहे. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कुणापुढेही न झुकता प्रामाणिकपणे लोकांच्या अडचणी सोडवायला हव्यात.
- डॉ. तरुण विजय, खासदार

भारताची संस्कृती ज्ञानाची आहे. ती टिकविण्याची जबाबदारी तरुणांची आहे. भारत हा एकविसाव्या शतकात जगाचे नेतृत्व करेल, असे विवेकानंद यांनी म्हटले आहे. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे.
- डॉ. विश्वनाथ कराड

Web Title: Do not compromise honesty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.