रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

By admin | Published: September 6, 2016 04:24 AM2016-09-06T04:24:55+5:302016-09-06T04:24:55+5:30

बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे.

Do not cry, fight! | रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

Next


तिवसा (अमरावती): बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. सगळीकडे यांत्रिकीकरण होत असताना महिलांनी धन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. आता महिलांनी रडत्या नव्हे, तर लढत्या बनण्याची गरज आहे असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले.
सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, अशा परिस्थितीत ताकदीने उभ्या राहणाऱ्या कर्तबगार शेतकरी महिलांच्या भव्य पोळ्याचे आयोजन सोमवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यालगतच्या पटांगणात शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच महिला शेतकऱ्यांसाठी असा पोळा आयोजित करण्यात आला. यामध्ये ३१ महिला शेतकऱ्यांनी बैलजोड्यांसह सहभाग नोंदविला. यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुमुद विवेक गौरखेडे या महिलेस साडीचोळी आणि २००१ रूपयांचे प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नेहा निलेश डागा यांनी द्वितीय, तर दामिनी रवि मकेश्वर यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. महिला शेकतऱ्यांच्या पोळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. तिवस्याच्या नगराध्यक्षा राजकन्या खाकसे, ठाणेदार दिनेश शेळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>पैसेच नाहीत, बैलांना साज कुठून घालावा ?
सर्वच महिलांनी बैलजोड्या सुंदर सजवून आणल्या. मात्र, शुभांगी डहाके या शेतकरी महिलेने धन्यासह उपस्थिती लावली खरी. पण, न सजविताच बैलजोडी पोळ्यात आणली होती. ‘पैसेच नसल्याने बैलांचा साज घेऊ शकले नाही’, असे मार्मिक वाक्य लिहिलेला फलक तिने बैलाच्या शिंगांवर लावला होता. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रत्येकजण अंतर्मुख झाला.

Web Title: Do not cry, fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.