दप्तरे गायबच!
By admin | Published: August 27, 2016 01:21 AM2016-08-27T01:21:13+5:302016-08-27T01:21:13+5:30
जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची दप्तरे आजही सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची दप्तरे आजही सापडत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार नोटिसा देऊनही ती सापडली नसल्याने अखेर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी शासनाची पंचायत राज कमिटी आली होती. या वेळी या समितीच्या पाहणीत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडे दप्तरच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते. या वेळी समितीने ग्रामपंचायत विभागाला चांगलेच फटकारले होते. ग्रामसेवकांकडून दप्तरे उपलब्ध करून घ्या, नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई केली याची माहिती द्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ ग्रामपंचायतींकडे दप्तरे उपलब्ध करून द्या म्हणून ग्रामपंचायत विभागाचा पाठपुरावा सुरू होता. तेथील ग्रामसेवकांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या. जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या सहीनेही नोटीस दिली होती. ४२ पैैकी २९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध करून दिले आहे. १३ ग्रामपंचायतींकडे अद्यापही ते उपलब्ध झाले नाही. त्यातील २ ग्रामसेवक आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. ७ ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यरत असलेल्या चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)
>अभिलेखे उपलब्ध नाहीत
भोर तालुक्यातील शिरवलीतर्फे भोर या ग्रामपंचायतीचे १९९९ ते २00२ पर्र्यंत दप्तर नाही. तेथील ग्रामसेवक बाळासाहेब गोविंद ढवळे (सध्या जुन्नर)खेड तालुक्यातील करंजविहिरे ग्रामपंचायतीचे १९९५ ते १९९९ चे दप्तर उपलब्ध नाही. त्यामुळे छबीर बाबुलाल आत्तार (सध्या भोर)इंदापूर तालुक्यातील कळाशी ग्रामपंचायतचे १९९८ ते १९९९ पर्यंत दप्तर नाही. त्यामुळे जगदीश भानुदास जमाले (सध्या जुन्नर)खेड तालुक्यातील वांद्रा ग्रामपंचायतीचे १९९७ ते २00४ पर्यंत दप्तर नाही. त्यामुळे भागवत आनंदा नागापुरे (सध्या जुन्नर)
>दोन ग्रामसेवकांवर
कारवाईबाबत चर्चा
सेवानिवृत्त सात व आंतरजिल्हा बदलीने गेलेल्या दोन ग्रामसेवकांवर कारवाईबाबत चर्चा सुरू असल्याचे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी सांगितले.