चर्चा नको, उपाय शोधा - भय्याजी जोशी
By admin | Published: December 18, 2015 01:05 AM2015-12-18T01:05:10+5:302015-12-18T01:05:10+5:30
आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी
- योगेश पांडे, नागपूर
आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भाजपाचे आमदार व मंत्र्यांना दिला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपाचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. या वेळी जोशी यांनी त्यांचे बौद्धिक घेतले. राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. वेळीच शेतकऱ्यांना सावरण्यात आले नाही, तर शेती संपायला वेळ लागणार नाही, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.
शिक्षणाच्या दर्जावर ओढले ताशेरे
या वेळी सरकार्यवाह यांनी राज्य शासनाच्या शिक्षण प्रणालीवर ताशेरे ओढले. राज्यात शाळा आहेत. परंतु तेथे दर्जेदार शिक्षण नाही. नववी झालेल्या विद्यार्थ्यांना मूलभूत बाबी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. दक्षिण भारतात गुरुकूल पद्धती चालते. येथून पदवी मिळत नाही. पण ज्ञान नक्कीच मिळते. अशा विविध प्रयोगांवर विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन जोशी यांनी केले.
जातीपातीचे राजकारण नको
आज देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राजकारणावर जातीचा पगडा दिसून येतो. जातीपातीचे राजकारण दूर सारून विकासावर भर द्यायला हवा, असे जोशी म्हणाले.