केंद्राने साखर आयात करून शेतक-यांचे वाटोळे करू नये - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:15 AM2017-09-09T04:15:01+5:302017-09-09T04:15:13+5:30
पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
कोल्हापूर : पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यंदा साखरेचे दर स्थिर राहिल्याने आता कोठे साखर कारखाने व शेतक-यांचे बरे चालले असताना त्यात ढवळाढवळ करून शेतक-यांचे वाटोळे करण्याचा उद्योग केंद्राने करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
शेट्टी म्हणाले, देशातील साखरेचा साठा तसेच दीड महिन्यात नवीन हंगाम सुरू होत असल्याने साखर आयात करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन आयातीला विरोध दर्शविणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीची बुधवारी (दि. १३) बैठक आहे. यामध्ये खासगी व सहकारी साखर कारखान्यांना आपला ताळेबंद सादर करावा लागेल. साखर आयुक्तांनी हिशेब तपासल्यानंतर अंतिम दराबाबत निर्णय होईल. आतापर्यंत ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळालेला नाही; पण या वर्षी साखरेचे दर चांगले राहिल्याने बहुतांश कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर द्यावाच लागेल. ऊस दर नियंत्रण समिती ही घटनात्मक असल्याने त्याच्याशी भाजपचा संबंध नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.
ते तर शिवसेनेचे अनुभवाचे बोल!
भाजपने ‘स्वाभिमानी’ फोडल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना शेट्टी म्हणाले, शिवसेनेचे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याने मी पळवून नेणाºयांना नाही तर पळून जाणाºयांना दोष देतो.