शिवसेनेला डिवचू नका
By admin | Published: September 11, 2016 02:16 AM2016-09-11T02:16:12+5:302016-09-11T02:16:12+5:30
बदलापूर पालिकेत शिवसेनेने भाजपाला सत्तेचा भागीदार केला आहे. ठरल्याप्रमाणे सेनेने भाजपाला सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपदाचे आश्वासन दिले आहे
बदलापूर : बदलापूर पालिकेत शिवसेनेने भाजपाला सत्तेचा भागीदार केला आहे. ठरल्याप्रमाणे सेनेने भाजपाला सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपदाचे आश्वासन दिले आहे. भाजपाला सभापतीपद दिले असून उपनगराध्यक्षपदही देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. मात्र असे असले तरी भाजपाच्या नगरसेवकांनी आणि आमदारांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. सत्तेत राहून विरोध करण्याची काहीही गरज नाही. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित राहण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांना मदत करण्यासाठी बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यात स्थानिक पातळीवर युती करण्यात आली. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात ठाकेलेले दोन्ही पक्ष एकत्रित सत्तेवर आले. युतीचा धर्म पाळत शिवसेनेने भाजपाला एक सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपदाचे आश्वासन दिले होते.
सभापतीपद भाजपाच्या वाटल्याला आले. मात्र अद्याप उपनगराध्यक्षपद आलेले नाही. हे मिळविण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र पालिकेत सत्ताधारी असतानाही भाजपाचे काही नगरसेवक ठरवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच भाजपाचे आमदार पालिकेच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती असतानाही मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठरल्याप्रमाणे सभापतीपद आणि उपनगराध्यक्षपद भाजपाला मिळेल.