मुरबाडमध्ये बिबट्याचे भय संपत नाही!
By admin | Published: August 26, 2016 02:53 AM2016-08-26T02:53:57+5:302016-08-26T02:53:57+5:30
सोनावळे गावात एका बिबट्याला गोळ््या घालून ठार केल्यानंतरही धसई परिसरात बिबट्याची दहशत अद्यापी कायम आहे.
पंकज पाटील,
मुरबाड- सोनावळे गावात एका बिबट्याला गोळ््या घालून ठार केल्यानंतरही धसई परिसरात बिबट्याची दहशत अद्यापी कायम आहे. अद्यापही ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. सोनावळे गावातील काही ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा बिबट्या पाहिल्याचा दावा केल्याने आणि या बिबट्याच्या पायाचे ठसेही दाखविल्याने गावातील वातावरण तंग आहे. ग्रामस्थांच्या या दाव्यावर वन विभागाने मात्र मौन बाळगले आहे. पुन्हा बिबट्या दिसला असेल तर मग बुधवारी मारलेला बिबट्या नरभक्षक होता, की पुन्हा दिसलेला यावरून तर्कर्वितर्कांना उधाण आले आहे.
धसई गावाजवळील कळंबाड गावातील एका फार्म हाऊसमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला रेंजमध्ये आणण्यासाठी कुंपणात वासरू बांधून ठेवले होते. बिबट्याने वासराची शिकार करण्यासाठी झेप घेतल्यावर लागलीच वन विभागाच्या बंदुकधारी शूटरने त्याचा वेध घेतला. बिबट्याला ठार केल्याची बातमी काही वेळातच गावभर पसरली. तो मारला गेल्याने ग्रामस्थांमधील दहशत कमी होणे गरजेचे होते. मात्र त्याची दहशत गावात कायम आहे. सोनावळे आणि रामपूर गावातील नागरिक अजूनही हदशतीच्या छायेत आहेत. बिबट्याचा बुधवारी रात्री खातमा झालेला असतांना सोनावळे गावात राहणारे सुभाष लक्ष्मण भोईर यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा गावालगत बिबट्या पहिल्याचा दावा केला आहे. त्याच्यासह इतर ग्रामस्थांनीही त्याला पुष्टी दिली आहे. या संदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. या बिबट्याच्या पायांचे ठसे देखील पुराव्यादाखल देण्यात आले आहे. ग्रामस्थ आपल्या भूूमिकेवर ठाम असले, तरी वन विभाग ते मानण्यास तयार नाही. नरभक्षक बिबट्याचा खातमा केला असून दुसरा बिबट्या नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गावात दुसरा बिबट्या आहे की नाही याबाबत दुमत असले तरी पळू, सोनावळे आणि रामपूर गावातील बिबट्याची दहशत संपुष्टात येण्यासाठी आणखी अवधी लागणार असल्याचे चित्र दिसते.
‘‘बिबट्याला ठार मारले आहे. गावात दुसरा बिबट्या नाही याची खात्री पटण्यास विलंब लागेल. ग्रामस्थांमधील दहशत कमी होत नाही तोपर्यंत गावात बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. तसेच गावात अफवा पसरणार नाहीत, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे.
- संजय भानुशाली, शिवसेना विभागप्रमुख, धसई.