राष्ट्रवादीच्या भूमिकेला बळी पडू नका - विखे
By admin | Published: October 26, 2015 02:39 AM2015-10-26T02:39:22+5:302015-10-26T02:39:22+5:30
पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे
लोणी (जि. अहमदनगर) : पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यांच्या भूमिकेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केले आहे.
मराठवाड्यातील जनता आपली बंधू आहे. त्यांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक झाले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीला अकोले, कोपरगाव, नेवासा, राहुरीत मोर्चाच्या निमित्ताने वादंग करायचे आहेत. पाणीप्रश्नी काँग्रेसची भूमिका योग्य व समन्वयाची आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी राज्यात बदनाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा आधार घेतला जात आहे. त्यांच्या भूमिकेला बळी न पडता सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कृष्णकृत्यांच्या चौकशा राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी एकही प्रभावी प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनी आता पाणीप्रश्नावर दंगे व गोळीबार कसा होईल, त्यात जनतेचा बळी कसा जाईल, यासाठी योजना आखल्याचे विखे म्हणाले. (वार्ताहर)