‘मार्केटिंग’मध्ये कमी पडू नका!

By Admin | Published: July 28, 2014 01:32 AM2014-07-28T01:32:33+5:302014-07-28T01:32:33+5:30

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली. ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान

Do not fall short in 'Marketing'! | ‘मार्केटिंग’मध्ये कमी पडू नका!

‘मार्केटिंग’मध्ये कमी पडू नका!

googlenewsNext

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन : जागावाटपाचा निर्णय दिल्लीतच होणार
नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली. ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सरकारच्या कामाचे ‘मार्केटिंग’ करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला जागावाटपाचा तिढा हा नवी दिल्लीतच सुटेल, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याप्रमाणे नागपूर व विदर्भात राष्ट्रवादीला ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. परंतु आत्ताच काही दावा करीत नाही कारण जागावाटपाचा निर्णय हा नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठी करतील, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे ते म्हणाले. आजवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांच्या सहकार्याने यश मिळाले. परंतु कॉंग्रेसचे काही नेते चुकीचे दावे करताहेत. आम्ही पण तसेच दावे करावे का, या शब्दांत त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना चिमटा काढला.
पदे मिळत नाहीत अशी विदर्भातील कार्यकर्त्यांची नेहमी तक्रार असते. आम्ही पदे देऊ, चिंता करू नका, फक्त अधिकृत उमेदवाराचा एकजुटीने व जोमाने प्रचार करा. झाले गेले विसरून जा, नव्या निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ काम करून भागत नाही, त्याचे प्रभावी ‘मार्केंिटंग’देखील हवे असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची बाजू उचलून धरली. विदर्भाने शरद पवारांना हवी तेवढी साथ दिली नसल्याचे मतदेखील अजित पवार यांनी व्यक्त केले.
अनिल देशमुख यांनी यावेळी नागपुर जिल्ह्यात राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्याच पाहिजे ही मागणी लावून धरली. कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान झाला पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रवादीला नागपुरात ३ जागा मिळाल्या पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील यांनी पक्षाच्या कामकाजाचे प्रास्ताविक केले. तर वेळ पडलीच तर कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी आहे असे मत नागपुर जिल्ह्यात ग्रामीण अध्यक्ष बंडोपंत उमरकर यांनी व्यक्त केले. माजी मंत्री रमेश बंग यांनीदेखील मार्गदर्शन केले.
यावेळी राट्रवादी कॉंग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गजभिये, अतुल लोंढे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Do not fall short in 'Marketing'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.