आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका!
By admin | Published: November 2, 2016 01:19 AM2016-11-02T01:19:34+5:302016-11-02T01:19:34+5:30
‘दिवसेंदिवस आजचा बळीराजा दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे.
जेजुरी : ‘दिवसेंदिवस आजचा बळीराजा दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे. आता संघर्ष करण्याचे बळ अंगी बाणा. आत्महत्यासारखा मार्ग अवलंबू नका, पुढच्या पिढीचा आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करा,’ असे आवाहन जिमा संघटनेचे अध्यक्ष तथा इंदू फार्माचे संचालक डॉ. रामदास कुटे यांनी जेजुरी येथील बळीराजापूजन कार्यक्रमात केले.
बहुतांश शेतकरी व कामगारांची लोकवस्ती असलेल्या ऐतिहासिक जुनी जेजुरी येथे सोमवारी (दि.३१) बलिप्रतीपदेनिमित्त संभाजी ब्रिगेड पुरंदर व बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक शेतीपूरक अवजारांचे पूजन, बळीराजा पूजन, ज्येष्ठ नागरिक मातांचा सन्मान, विविध मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुटे होते. या वेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत, उद्योजक अनंत देशमुख, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक शिवाजी काळाणे, संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे कार्याध्यक्ष ह.भ.प. दशरथतात्या जगताप, कवी डॉ. विनोदकुमार सिंह, बबनराव कोरे, सुतारअप्पा गुरुजी, मराठा सेवा संघाचे ज्ञानोबा जाधव, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन. डी. जगताप आदींसह शेतकरी बांधव, ज्येष्ठ नागरिक, माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यपातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी सांगितले, तर बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानचे सदस्य व्यसनमुक्त राहून पानटपरी पासून विविध उद्योग व्यवसायात कार्यरत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी जगताप यांनी, तर आभार उद्योजक मोहन भोसले यांनी मानले. या वेळी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या युवतींचा सन्मान करण्यात आला. (वार्ताहर)
>गेल्या १८ वर्षांपासून जुनी जेजुरी येथे ज्येष्ठ माता, शेतकरी, बळीराजा पूजन आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठाचा सन्मान होतो. हा स्तुत्य उपक्रम असून जीवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी आणि संस्कारक्षम होण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मोलाचे असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.