अकरावी आॅफलाईन प्रवेशाच्या अमिषाला भुलू नका!
By admin | Published: July 4, 2016 08:49 PM2016-07-04T20:49:39+5:302016-07-04T20:49:39+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे आॅफलाईन प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ नका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे आॅफलाईन प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.
प्रवेशासाठी मान्यता नसताना काही शाळा आणि महाविद्यालये अनधिकृतपणे प्रवेश देत असल्याच्या तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, गुणवत्तेनुसार व पारदर्शक पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडावी, म्हणून यंदा १०० टक्के प्रवेश आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. तरी आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देऊन काही महाविद्यालये न्यायावयाचा अवमान करत आहेत. परिणामी अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील.
आॅफलाईन प्रवेशाला चाप लावण्यासाठी प्रवेश नियंत्रण समिती व क्षेत्रीयअधिकाऱ्यामार्फत अचानक भेटी देऊन अकरावी प्रवेशाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील कोणत्यागी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आॅफलाईन प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले, तर शिक्षणउपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.