पनवेलच्या इतिहासाचा सिडकोला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 02:05 AM2016-03-14T02:05:13+5:302016-03-14T02:05:13+5:30

दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी करण्याची घोषणा सिडकोने केली आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये पनवेल तालुक्याच्या इतिहासाला उजाळा मिळेल, असा एकही प्रकल्प नाही

Do not forget the history of Panvel, CIDCO | पनवेलच्या इतिहासाचा सिडकोला विसर

पनवेलच्या इतिहासाचा सिडकोला विसर

googlenewsNext

नामदेव मोरे. नवी मुंबई
दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी करण्याची घोषणा सिडकोने केली आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये पनवेल तालुक्याच्या इतिहासाला उजाळा मिळेल, असा एकही प्रकल्प नाही. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, हिरवे गुरुजींसह दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचे एकही स्मारक आतापर्यंत उभारलेले नाही. भविष्यातही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्येही इतिहासाला उजाळा देणारा एकही प्रकल्प नाही.
देशभर स्मार्ट सिटी स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर सिडकोने दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत कधीच उल्लेख न झालेले दक्षिण नवी मुंबई हे नाव स्मार्ट सिटीसाठी कोणी निश्चित केले, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पनवेल तालुक्यात हे शहर वसविले जात असताना मूळ शहराचे नाव नकाशावरून पुसले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरातील जमीन ताब्यात घेतल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी स्मारके उभी केली, उत्सव चौक, शिल्प चौक, वाईट ऐकू नये, बोलू नये व पाहू नये हा संदेश देणाऱ्या तीन आधुनिक माकडांचे शिल्पही खारघरमध्ये उभे केले. २००५ मध्ये लाखो रुपये खर्च करून शिल्प कार्यशाळा आयोजित करून लाल दगडामध्ये नवीन शिल्पं साकारली. परंतु अनावश्यक स्मारकांवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या सिडकोने पनवेलचा इतिहास जपण्यासाठी व पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी एकही प्रकल्प उभारलेला नाही. १८५७ च्या बंडानंतर स्वातंत्र्यासाठीचा सशस्त्र लढा थांबला होता. यावेळी पनवेल तालुक्यामधील शिरढोणचे वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा सुरू करून देशवासीयांमध्ये क्रांतीचे विचार रुजविले. देशाच्या संसदेमध्ये आद्य क्रांतिकारकांचे तैलचित्र आहे. परंतु सिडकोला त्यांच्या कार्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये पनवेलमधील अनेकांनी रक्त सांडले आहे. हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी हे गोवा मुक्ती संग्रामामध्ये अग्रभागी होते. १८५४ मध्ये हिरवे गुरुजींनी तारखेलच्या किल्ल्याजवळ सत्याग्रह केला. त्यांचे सहकारी आल्फ्रेड आफोन्सोनी यांनी किल्ल्यावर तिरंगा फडकविला. पोर्तुगिजांनी सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये हिरवे गुरुजी शहीद झाले. याव्यतिरिक्त अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, पण त्यांची दखल अद्याप घेण्यात आली नाही.
प्रकल्पग्रस्तांसाठीही पनवेलकरांनी दिलेला लढा देशातील सर्वात यशस्वी लढा म्हणून ओळखला जातो. परंतु दि. बा. पाटील यांचे कर्तृत्व भावी पिढीला माहीत व्हावे, यासाठीही काहीच प्रयत्न होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरपालिकेचे सकारात्मक प्रयत्न
सिडको येथील इतिहास विसरली असली तरी पनवेल नगरपालिकने त्यांच्या परीने इतिहासातील सोनेरी क्षण जपण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपालिकेच्या समोर गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या हिरवे गुरुजींचा पुतळा बसविला आहे. शहराच्या मध्यभागी सर्व हुतात्म्यांची व स्वातंत्र्यसैनिकांची नावे असणारा स्तंभ तयार केला आहे.
नगरपालिकेने बांधलेल्या नाट्यगृहालाही आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आले आहे. फक्त १५० कोटींचा अर्थसंकल्प असणारी नगरपालिका एवढे करू शकते; मग स्मार्ट सिटीसाठी स्वत:च्या गंगाजळीतील ३७ हजार कोटी खर्च करणारी सिडको कंजुसी का करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोच्या स्मार्ट सिटीचा उल्लेख दक्षिण नवी मुंबईत झाला तर पनवेल हे त्यामधील फक्त उपनगर होणार का? पनवेल तालुका हीच पहिली स्मार्ट सिटी का होऊ शकत नाही? येथील भूमिपुत्रांनी स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत सदैव संघर्षच केला आहे.
संघर्षाशिवाय येथील नागरिकांना कधीच काही मिळाले नाही. भविष्यात या भूमीचा इतिहास, देशासाठी व शेतकऱ्यांसाठी हुतात्मा झालेल्यांची स्मारके व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्यासाठी व येथील इतिहास टिकविण्यासाठीही संघर्ष करावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
> सिडकोने दक्षिण नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी होण्याची घोषणा केली आहे. यामध्ये प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, मॉल्स, मल्टिप्लेक्स, टोलेजंग इमारती असणार आहेत.परंतु काँक्रीटचे शहर म्हणजेच स्मार्ट सिटी होते का ? या शहराचा इतिहास, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महापुरुषांची स्मारके, भूमिपुत्रांच्या हक्कासाठीची चळवळ भावी पिढीला माहीत व्हावी यासाठी योग्य दखल घेणे आवश्यक आहे.
> >
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी
विनायकराव मोरेश्वर गोविलकर
वसंत महादेव वेदक
चापसी पुरुषोत्तम रेवासीया
आत्माराम महादेव आटवणे
केशव गणेश ऊर्फ दादाभाई गुप्ते
मुरारजी पुरुषोत्तम करवा
रामकृष्ण विश्वनाथ आपटे
त्रिंबक नारायण बेडेकर
पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट
रामकृष्ण गणेश आपटे
दत्तात्रेय श्रीधर कारूळकर
शंकर चिंतामण ऊर्फ बापूसाहेब खरे
मारुती मुकुंद पन्हाळे
चंदुलाल परशुराम लाहोटी
अजगर इब्राहिम शेख
देवराम नारायण काठे
रामचंद्र बाळा हाडगे श्रीमती मधुबाई गांगल
शिवराम कांदे
गोविंद काशिनाथ पटवर्धन
हरी विष्णू भाटे
शंकर नारायण पांडव
नारायण धोंडू खरे
दलिचंद लालचंद कोठारी
किसन एकनाथ जगनाडे
प्रभाकर केशव गुप्ते
प्रेमराज मोतीलाल मुणोथ
भिकाजी नथू चितळे
मदन गजानन मानकामे
मधुसूदन शंकरराव चिटणीस
मेघजी मनजी शेठ
रामचंद्र परशुराम लाहोटी
लालचंद आसाराम जाजू
वासुदेव पुरुषोत्तम आचार्य
शांतीलाल मोतीलाल मुणोथ
शांतीलाल चुनीलाल गुगळे
सदाशिव रामचंद्र ठाकूर

Web Title: Do not forget the history of Panvel, CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.