भारतीयत्व विसरू नका : भाई जगताप
By admin | Published: September 15, 2016 01:41 AM2016-09-15T01:41:28+5:302016-09-15T01:41:28+5:30
तरुणांनी आधुनिक तंत्र म्हणून ‘गुगल’ला गुरू माना. मात्र, भारतीयत्व विसरू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केले.
इंदापूर : तरुणांनी आधुनिक तंत्र म्हणून ‘गुगल’ला गुरू माना. मात्र, भारतीयत्व विसरू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मंडळाचे माजी अध्यक्ष, खा. कै. शंकरराव पाटील यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त, इंदापूर महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत ह्यआधुनिक भारत निर्मितीत तरुणांचे योगदानह्ण या विषयावर ते बोलत होते. या वेळी भाई जगताप म्हणाले, की तरुणांनी आधुनिक भारताचे शिल्पकार, क्षितिजे समजून घेणे गरजेचे आहे. आधुनिक भारत घडवण्यात तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. सर्वाधिक तरुणाईची शक्ती भारतात आहे. शिकण्याची वृत्ती ठेवावी. योग्य आधारासाठी मूलभूत संदर्भग्रंथाचा वापर करावा. प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण असतो. तो विकसित होण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या पुढची आव्हाने वेळीच ओळखून त्यावर मात करावी. हर्षवर्धन पाटील म्हणाले, की ज्यांनी पुण्य साठवलेले असते, त्यांचीच पुण्यतिथी साजरी केली जाते. कै. शंकरराव पाटील तथा भाऊ हे या मातीत रुजलेले एक विचार आहे. त्याची प्रगल्भ वाटचाल सुरू आहे.
ह. भ. प. अॅड. जयवंत बोधलेमहाराज ‘युवा पिढी व भविष्यातील आव्हान’ या विषयावर बोलताना म्हणाले, की संस्कारमय शिक्षणाची जीवनाला गरज आहे. भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या पायावर उभी आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे जीवन तेजोमय होते. कर्मयोग सिद्ध झाल्याशिवाय कर्मयोगीत्व प्राप्त होत नाही. युवकांनी आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाऊन आनंददायी जगले पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. बाळासाहेब पराडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी आभार मानले. संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, क्रीडासंचालक प्रा. भरत भुजबळ या वेळी उपस्थित होते.