मातृभाषा आणि मातृभूमीला विसरू नका - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 08:35 PM2018-03-29T20:35:56+5:302018-03-29T20:35:56+5:30
ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये.
पिंपरी - ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. घर, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मातृभाषेतच बोलावे, भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी येथे आज केले.
पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या नवव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू पी. एन राजदान, अधिष्ठाता डॉ. ए. एन सुर्रेकर, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गुरू सेवा मंडळाचे अॅड. विष्णू पारनेरकर, पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन प्रतापसिंह जाधव यांनी डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच केआयआयटी भुवणेश्वरचे संस्थापक प्रा. अच्युत सामंता यांना डॉक्टर आॅफ सायन्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी १०५६ विद्यार्थ्यांना पदवी आणि १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि बारा विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
‘‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पदवीदान हा अंत्यत महत्वाचा क्षण आहे. या सोहळ्यास उपस्थित असणा-या सर्वांना माझा नमस्कार. मराठी ही अत्यंत सुंदर भाषा आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मराठीतून बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तीस मिनिटांच्या भाषणात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले. युवाशक्ती, शिक्षण प्रणाली, संस्कृती, पालकांची कर्तव्ये यावर भाष्य करून पुणेकरांना जिंकले. उपराष्ट्रपती म्हणाले, ‘‘शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाविद्यालयीन शिक्षण हा ज्ञानप्राप्तीचा महत्वाचा टप्पा आहे. मुलांनी नेत्रदीपक यश मिळविले सर्वांचे अभिनंदन. कुटुंब, समाज आणि देश विकासाची मोठी जबाबदारी तरूणांवर आहे. देशाचे भवितव्य तरूणांच्या हाती आहे. अतिथी देवो भव्, मातृदेवो, पितृदेवो भव्, वसुदेव कुटुंबम् आणि समधर्म समभाव ही आपली संस्कती आहे. संस्कृतीचे जतन करण्याचे काम करावे. त्यामुळे देशाच्या विकासात हातभार लावावा.’’