जवान, किसान यांना विसरू नका - मकरंद अनासपुरे
By Admin | Published: September 22, 2016 05:28 PM2016-09-22T17:28:59+5:302016-09-22T17:28:59+5:30
शेतात २४ तास राबून शेतकरी पिकाला पाणी देतो. मात्र, या शेतकऱ्यांच्या कांदयाला पाच पैसे किलोने भाव मिळतो, अशी खंत व्यक्त करताना जगातील सर्वात महान असलेल्या आपल्या जवान आणि किसानाना विसरू नका
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २२ : नोकरदारांपेक्षा शेतकऱ्यांची मेहनत अधिक आहे. शेतात २४ तास राबून शेतकरी पिकाला पाणी देतो. मात्र, या शेतकऱ्यांच्या कांदयाला पाच पैसे किलोने भाव मिळतो, अशी खंत व्यक्त करताना जगातील सर्वात महान असलेल्या आपल्या जवान आणि किसानाना विसरू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. आजच्या युवकांनी माथेफिरू सारखे ना वागत आपली ऊर्जा विधायक कामाला लावावी, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे आवाहनही अनासपुरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने तुळजापूर येथे १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत 'अंकुर' किरण आशेचा वेध आकाशाचा हे ब्रीद घेऊन केंद्रीय युवक महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी अभिनेते अनासपुरे हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे, नलिनी चोपडे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, नगराध्यक्षा मंजुषा मगर, सतीश पत्की, कुलसचिव प्रा. डॉ.प्रदीप जब्दे, डॉ. सुहास मोराळें, प्राचार्य एन.डी. पेरगळ, प्राचार्य डॉ.अशोकराव मगर, डॉ. दिलीप बडे, दासू वैद्य, डॉ. लक्ष्मीकांत शेळके, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री तुळजाभवानी देवी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांच्या सत्कारानंतर संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले यांनी युवक मोहत्सवाचे आयोजन, समित्यांचे काम यांच्या कामाची माहिती दिली. प्रस्ताविकात विध्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. सुहास मोराळें यांनी महोत्सव तुळजापुरात आयोजनाचा हेतु विशद केला.
स्वतःचे महाविद्यालयीन जीवन, युवक महोत्सवात मिळालेली संधी आणि यशस्वी कारकिर्दीचा उहापोह करून अनासपुरे म्हणाले, युवक महोत्सवातील यशावर हुरळून जाऊ नका. केंद्रीय युवक महोत्सव हि पहिली पायरी असून, विभागीय, राष्ट्रीय महोत्सवात यश मिळवावे. सिने क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अगोदर त्या क्षेत्रातील जाणकारांच्या कार्याची, बारीक सारीक बाबींची माहिती घ्यावी. सातत्य आणि चिकाटीने प्रयत्न केल्यानंतर यश नक्की मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठवाडा मागासलेला आहे, ही मानसिकता बदल. तरुणानी आयुष्यात मागास हा शब्द यापुढे ना वापरता यश मिळविण्यासाठी धडपड करावी. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काम करावे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांनी केलेले काम हे कोण्या एका जाती-धर्मासाठी केलेले नाही तर ते संबंध जगासाठी आदर्शवत आहे. त्यामुळे या महापुरुषांचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारानुसार वागावे असा सल्लाही त्यांनी दिला.
आज आपल्या देशासह सर्वत्रच औद्योगिकरनाला प्राधान्य देण्यात आले आहे. एकीकडे प्रगती होत असली तरी दुसरीकडे दुष्काळ, अवेळी पाऊस या समस्या भेडसावत आहेत. नाम फाउंडेशनने ५६२ किलोमीटर नदी-ओढ्याच्या खोलीकरण-रुंदीकरणाचे काम केले असून, सद्या या सर्व कामात पाणीसाठा झाला आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्यामुळे युवकांनी आपली ऊर्जा एकत्र करून वृक्षारोपण आणि त्याच्या संवर्धनासाठी काम करावे. प्रगती करत असताना केवळ स्वतःचा विचार न करता इतरांच्याही प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. पैसा आला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे होत नाही. दुसऱ्यांना मदत करा, एकमेकांच्या प्रगतीत हातभार लावा, गोरगरिबांना मदत करा, रिकाम्या गाडीत तालुक्याला चकरा मारताना शेतकऱ्यांच्या मालाचे पोते सोबत नेऊन त्याला मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद मूळे यांनी तर आभार प्राचार्य एन.डी. पेरगल यांनी मानले.
हुंडा घेऊ नका
युवकांनी माथेफिरू सारखे ना वागता आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी असे सांगताना युवकांनी लग्नात हुंडा घेऊ नये. जो हुंडा घेईल तो नामर्द, असे ते म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
तुळजापूर हिरवेगार करा
श्री तुळजाभवानी देवीची ओटी हिरव्या साडीचोळीने भरली जाते. त्याच प्रमाणे तुळजापूर शहर हिरवेगार करण्यासाठी तुळजापूर वाशियानी वृक्षारोपण करून झाडे जोपासवीत असे आवाहन अनासपुरे यांनी केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे
नगराध्यक्षा मंजुषा मगर यांनी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातून नेतृत्व करण्याची संधी आणि नगराध्यक्ष पदापर्यंतची वाटचाल याची माहिती देऊन युवकांनी आपापले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तसेच श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
पवार बंधूंची सामाजिक बांधिलकी
तुळजापूर शहरातील बालाजी पवार आणि अरुण पवार या बंधूनी महोत्सवात सामाजिक बांधिलकी दाखवीत मोफत पाणीपुरवठा केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी चार दिवस रोज ४०० जार आणि स्वयंपाकासाठी एक टँकर पाण्याचा मोफत पुरवठा केला.
नवे काही करण्याची अशा
अंकुर युवक महोत्सवात मागील चार दिवसांपासून विध्यार्थ्यांना अनेक बाबी शिकण्यास मिळाल्या. जय-पराजय यापेक्षा नवे काही करण्याची आशा निर्माण झाल्याचे मत युवक-युवती व्यक्त करीत होते. विशेषतः शेती या विषयावरील कालाप्रकारातून अनेक विषय समोर आले असून, शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू, असाही संकल्प अनेक युवकांनी केला.
देशातील एकमेव विद्यापीठ
किरण आशेचा, वेध आकाशाचा हे ब्रीद घेऊन शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन युवक महोत्सव साजरे करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. युवकांनी कॉपीमुक्त परीक्षांची परंपरा कायम ठेऊन, यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठवाड्याची संस्कृती मोठी आहे. या संस्कृतीचा आणि विद्यापीठाचा नावलवकीक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.