राष्ट्रपतीपद नको, संघच सर्वस्व - भागवत
By admin | Published: March 30, 2017 04:56 AM2017-03-30T04:56:56+5:302017-03-30T04:57:05+5:30
राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, संघकार्य हेच
नागपूर : राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, संघकार्य हेच जीवनध्येय असून राष्ट्रपतिपद मिळाले तरी ते स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करून खुद्द सरसंघचालकांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत मी असल्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांतून वाचायला आणि पहायला मिळाले. मी संघाचा एक स्वयंसेवक आहे. संघात येताना इतर सर्व क्षेत्रांचे दरवाजे बंद केले होते. तसे करूनच संघकार्याला प्रारंभ केला होता. त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी माझे नाव समोर येणे अशक्यच आहे.
जर यदाकदाचित माझे नाव समोर आले आणि मला हे पद मिळाले तरी ते मी स्वीकारणार नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. नागपुरात एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
प्रसिद्ध होण्यापेक्षा कार्याने मोठे व्हावे
आजकाल अनेक जण प्रसिद्धीच्या मागे जाताना दिसतात. मात्र प्रसिद्धी ही दुधारी तलवार आहे. प्रसिद्ध झाला म्हणजे व्यक्ती मोठा झाला असे होत नाही. प्रसिद्ध न होता स्वत:च्या कार्याने मोठे होणे जास्त महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादनदेखील भागवत यांनी केले.
त्या बातम्या मनोरंजन करणाऱ्या होत्या
प्रसिद्धीमाध्यमांमध्ये अनेक गोष्टी येत असतात. या बातम्या मनोरंजन करणाऱ्या होत्या. करमणुकीची गोष्ट म्हणून वाचा आणि सोडा अशा त्या बातम्या होत्या. त्यांना जास्त गंभीरतेने घेतले नाही. ही एक हवाच राहणार आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.