शेतक-यांना समुपदेशन करणारे मानसशास्त्रज्ञच मिळेना !

By admin | Published: December 14, 2015 02:16 AM2015-12-14T02:16:26+5:302015-12-14T02:16:26+5:30

अनुभवाच्या अटीमुळे प्रेरणा प्रकल्पात अडथळा.

Do not get a psychologist to counsel the farmers! | शेतक-यांना समुपदेशन करणारे मानसशास्त्रज्ञच मिळेना !

शेतक-यांना समुपदेशन करणारे मानसशास्त्रज्ञच मिळेना !

Next

विवेक चांदूरकर/ वाशिम : राज्य शासनाच्यावतीने शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येणार आहे; मात्र मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबत शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे ही पदे भरली गेली नसल्याने हा प्रकल्प राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे.
राज्यात लाखोंच्या संख्येत शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. शासनाच्यावतीने आतापर्यंत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यादरम्यान शेतकर्‍यांना आर्थिक मदत, विविध शेतीपयोगी वस्तू, गाई- म्हशी देण्यात आल्या; मात्र त्यानंतरही आत्महत्या कमी होत नसल्यामुळे आता प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विशेष समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी मानसशास्त्र विषयात एम.ए. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ३00 तास काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदाकरिता शासनाच्यावतीने आतापर्यंत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये तीन ते चार वेळा जाहिराती काढण्यात आल्या. त्यानुसार अनेक इच्छुक उमेदवार मुलाखतीकरिता आले; मात्र मानसशास्त्रात एम.ए. केलेले उमेदवार असले तरी त्यांना रुग्णालयांमध्ये ३00 तासांचा अनुभव नसल्याने सदर पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्थिती हीच आहे. त्यामुळे सध्या मानधन तत्त्वावर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील मानसशास्त्रज्ञांना शेतकर्‍यांना समुपदेशन करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे; मात्र त्यांचाही पुरेसा वेळ मिळत नसल्याने प्रकल्प राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे.
शासनाने प्रेरणा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्याकरिता एम.ए. मानसशास्त्र तसेच ३00 तासांचा अनुभव असलेले उमेदवार मिळणे आवश्यक आहे; मात्र ३00 तासांचा अनुभव असलेले उमेदवार मिळत नसल्यामुळे पदे भरण्यात अडचणी येत असल्याचे वाशिम जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
जनार्दन जांभरूणकर यांनी स्पष्ट केले.

*मानधन तत्त्वावर पदे भरण्याची परवानगी मागणार
शासनाने ठरविलेल्या अटींनुसार समुपदेशन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ मिळत नसल्यामुळे मानधन तत्त्वावर समुपदेशकांची नियुक्ती करण्याची परवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयांच्यावतीने शासनाकडे मागण्यात येणार आहे. मानसशास्त्रात एम.ए. झालेले, मात्र अनुभव नसलेले किंवा खासगी मानशास्त्रज्ञांना कार्यक्रमानुसार मानधन देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Web Title: Do not get a psychologist to counsel the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.