‘त्या युवकांची पुन्हा सुटका करू नका!’
By admin | Published: December 29, 2015 01:38 AM2015-12-29T01:38:50+5:302015-12-29T01:38:50+5:30
इसिसमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या तीन युवकांसोबत कठोरपणे वागण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने तेलंगण सरकारला दिले आहेत. मोहम्मद अब्दुल्ला बासित, सईद ओमर फारुख
नागपूर/नवी दिल्ली : इसिसमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या तीन युवकांसोबत कठोरपणे वागण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने तेलंगण सरकारला दिले आहेत. मोहम्मद अब्दुल्ला बासित, सईद ओमर फारुख हुसैनी आणि माज हसन फारुख अशी या तिघांची नावे आहेत. हैदराबादहून नागपूरला आलेल्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. श्रीनगरला जाऊन आधी जिहादी गटांमध्ये आणि इसिसमध्ये सामील होण्यासाठी हे नागपूरला आले होते.
या तिघांची पुन्हा सुटका होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश गृहमंत्रालयाकडून मिळाल्यानंतर त्यांना रविवारी नागपूरहून हैदराबाद येथे आणताच अटक करण्यात आली. यापूर्वीही या तिघांनी बांगलादेशमार्गे अफगाणिस्तान आणि इराक-सीरियात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना अब्रार व नोमान या अन्य दोघांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना लगेच सोडण्यात आले होते.
बासित, हुसैनी व फारुख यांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. भादंविच्या कलम १२१, १२१-ए, १२० (बी) आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.