पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ देऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:10 AM2018-11-27T06:10:50+5:302018-11-27T06:11:02+5:30
केंद्र सरकारचे सर्व राज्यांना नवे निर्देश; इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही ठरविले
नवी दिल्ली : इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाऊ नये व पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असू नये, यासह इतरही अनेक निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी करायचा अभ्यास व त्यांनी पाठीवर वागविण्याच्या दप्तराचे ओझे, याविषयी केंद्राने ठरवून दिलेल्या निकषांनुसार राज्यांनी सर्व शाळांसाठी मार्गदर्शिका जारी करावी, असे सांगण्यात आले आहे.
या नव्या निर्देशांनुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न देण्याचे बंधन शाळांवर घालण्यात आले आहे, तसेच पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित याखेरीज अन्य कोणतेही विषय शाळांनी अभ्यासासाठी लावू नयेत. इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही ‘एनसीईआरटी’ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसारच भाषा, गणित आणि पर्यावरण रक्षण हे विषय शिकविले जावेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
या नव्या आदेशात विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार त्यांच्या दप्तराचे कमाल वजन किती असावे, याचे कोष्टकही ठरवून देण्यात आले असून, दप्तराचे ओझे निष्कारण वाढेल, असे अन्य कोणतेही जास्तीचे साहित्य व पुस्तके शाळेत आणण्यास सांगितले जाऊ नये, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.