शेतकऱ्यांना व्याजमाफी नको, कर्जमाफी द्या !
By admin | Published: May 14, 2016 02:31 AM2016-05-14T02:31:07+5:302016-05-14T02:31:07+5:30
राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात.
लातूर : राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात. महाराष्ट्राचे हात हलवत परत येतात. केंद्राने नाही दिले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी १०-१५ हजार कोटी देणे सरकारला काय अवघड आहे ? व्याजमाफी नको तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली.
दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मे महिना आला तरी सरकारच्या उपाययोजना नाहीत. गारपीटीचे पैसे दिले. ३१ मार्चपर्यंत वाटा असे आदेश होते. ते शक्य न झाल्याने पैसे परत गेले. त्याला मुदतवाढ का दिली नाही ? हे पैसे विदर्भाकडे वळवण्यात आले. आता तर सुप्रिम कोर्टाने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासंबंधीच्या वीजबील माफ, शैक्षणिक फी माफ, व्याज माफ अशा साऱ्या सवलती द्याव्यात.
लातूरला रेल्वेने पाणी देणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाणी दिल्याचे अभिमानाने सांगितले, पाठोपाठ पाण्याचे बिलही दिले. त्यांच्यात पाणी आहे काय ? टँकरवर फलक लावले. आता पाण्यात कमळ तरी सोडू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)
वर्षभरात सरकार जाईल : हे सरकार पुढच्या वर्षभरात जाईल. त्यानंतर पुन्हा ते कधीच निवडून येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सेना आणि भाजपा यांच्यातील नाते फार काळ टिकेल असे वाटत नसल्याचे राणे यांनी सांगितले.