उत्सवांसाठी पाणी देऊ नका!
By Admin | Published: January 19, 2016 03:48 AM2016-01-19T03:48:48+5:302016-01-19T03:48:48+5:30
महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असल्याने नाशिक जिल्ह्याच्या गंगापूर धरणातील पाणी कोणत्याही धार्मिक सणासाठी न सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला.
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असल्याने नाशिक जिल्ह्याच्या गंगापूर धरणातील पाणी कोणत्याही धार्मिक सणासाठी न सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिला. त्याचबरोबर ‘मांगी-तुंगी’ या जैनांच्या तीर्थक्षेत्री फेब्रुवारीमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठीही गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचा आदेश देण्यात आला.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती असतानाही राज्य सरकारने कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी पाणी सोडले. याविरोधात पुण्याचे प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर होती.
नाशिकमध्ये ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ‘मांगी-तुंगी’ या जैनांच्या तीर्थक्षेत्री मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीही राज्य सरकार गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे, अशी भीती देसरडा यांनी सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठापुढे व्यक्त केली. उच्च न्यायालयाने कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी पाणी न सोडण्याचा आदेश सप्टेंबरमध्ये राज्य सरकारला दिला होता.
राज्यात दुष्काळ असताना शाहीस्नानासाठी पाणी सोडल्यामुळे खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले होते. गंगापूर धरणातून पाणी सोडायचे असल्यास सरकारने न्यायालयाची पूर्व-परवानगी घ्यावी, असाही आदेश खंडपीठाने दिला होता. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी २९ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)