‘तिचा’ नोकरीचा हक्क हिरावू नका
By admin | Published: November 3, 2016 05:10 AM2016-11-03T05:10:01+5:302016-11-03T05:10:01+5:30
महिलेला कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार आहे.
नागपूर : महिलेला कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार आहे. हा हक्क हिरावून घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नागपूर कुटुंब न्यायालयाने दिला आहे.
पत्नीच्या नोकरीवर निर्बंध लावण्यासाठी एका व्यक्तीने दाखल केलेली याचिका नुकतीच फेटाळण्यात आली. राज्यघटनेने नागरिकांना कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे कोणाच्या नोकरीवर निर्बंध आणणे चुकीचे व घटनाबाह्य असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.
या प्रकरणातील पती श्रीकृष्णनगर येथील रहिवासी आहे. या दाम्पत्याचे १० डिसेंबर २०१२ रोजी लग्न झाले. पती एका खासगी कंपनीत नोकरीवर असून, पत्नीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे पत्नीने नोकरी करू नये, असे त्याचे म्हणणे आहे. यावरून दोघांमध्ये वाद होत असे. पत्नीला उत्तर प्रदेशात शिक्षकाची नोकरी मिळाली. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. यामुळे पतीने कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)