‘विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष नको’ - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:44 AM2017-07-21T02:44:54+5:302017-07-21T02:44:54+5:30
मुंबईसारख्या शहरातील विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने विमानतळाजवळील एका सोसायटीची याचिका निकाली काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसारख्या शहरातील विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने विमानतळाजवळील एका सोसायटीची याचिका निकाली काढली.
मुंबई विमानतळाजवळील बहुतांशी इमारती उभारताना उंचीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे विमानातील प्रवासी व खुद्द रहिवाशांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुनीता को-आॅप. हौ. सोसा.च्या दोन्ही इमारतींचा पाचवा व सहावा मजला पाडण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.
उच्च न्यायालयाने या सोसायटीवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश काहीच महिन्यांपूर्वी महापालिकेला दिला होता. तर सोसायटीने बांधकाम नियमित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
मुंबईसारख्या शहरातील विमानतळावर जिथे दर पाच मिनिटांनी विमाने उड्डाण करतात किंवा उतरतात, अशा विमानतळाजवळील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोसायटीची याचिका फेटाळली.