विद्यापीठांमध्ये असहिष्णुता नको - राष्ट्रपती

By admin | Published: March 18, 2017 01:54 AM2017-03-18T01:54:22+5:302017-03-18T01:54:22+5:30

संकुचित मानसिकता आणि विचारांना या काळात मागे टाकले पाहिजे. आधुनिक भारतीय विद्यापीठांतील वातावरण मोकळे असण्याची आवश्यकता असून विद्यापीठांत

Do not intimidate universities - President | विद्यापीठांमध्ये असहिष्णुता नको - राष्ट्रपती

विद्यापीठांमध्ये असहिष्णुता नको - राष्ट्रपती

Next

मुंबई : संकुचित मानसिकता आणि विचारांना या काळात मागे टाकले पाहिजे. आधुनिक भारतीय विद्यापीठांतील वातावरण मोकळे असण्याची आवश्यकता असून विद्यापीठांत असहिष्णुता, पूर्वग्रह, द्वेषाला जागा नको. विविध विचारधारा, दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञानाला शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळणे गरजेचे आहे. आधुनिक शिक्षणामुळे बौद्धिक संपदा वाढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मुंबई विद्यापीठातील विशेष पदवीदान समारंभात शुक्रवारी केले.
मुंबई विद्यापीठातर्फे हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते एलएल.डी या पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. एम. ए. खान, डॉ. अनिल पाटील, परीक्षा निरीक्षक दीपक वसावे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
राष्ट्रपतींनी या दिमाखदार सोहळ्यात आधुनिक शिक्षण आणि देशाच्या विकासाचे महत्त्व अधोरेखीत केले. या वेळी ते म्हणाले की, सध्याच्या काळात आधुनिक शिक्षण आणि अर्थव्यवस्थेची सांगड घालण्यासाठी विद्यापीठांत वेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील विकासासाठी अभ्यासक्रमात बदल होणे आवश्यक आहे. यातूनच पुढे कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊ शकेल. शेती क्षेत्रात संशोधन व्हायला पाहिजे. कृषी क्षेत्रातील प्रगतीबरोबरच सकस अन्न निर्मितीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जागतिक इको सिस्टीमचा अभ्यास करून संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, डॉ. स्वामीनाथन यांना गेल्या ५० वर्षांपासून मी ओळखतो. त्यांनी भारतीय शेती क्षेत्रात क्रांती केली. गेल्या ६५ वर्षांपासून त्यांनी शेती क्षेत्रात संशोधनपर कार्य केले आहे. अन्न सुरक्षा क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. मुंबई विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणामुळे देशाच्या प्रगतीत येथील अनेक क्षेत्रांत विद्यार्थ्यांचे योगदान मोठे आहे. याआधी आर.जी भंडारकर, दादाभाई नौरोजी, सी.व्ही. रमण आणि एम. विश्वेश्वरय्या यासारख्या समाजसुधारकांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या सर्वांनी विविध क्षेत्रांत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. (प्रतिनिधी)

सामाजिक संशोधनावर भर द्या - स्वामीनाथन : एलएल.डी या सन्मानाला उत्तर देताना डॉ. एम.एस. विश्वनाथन यांनी आजच्या तरुणांना संदेश दिला. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना, सामाजिक संशोधनावर भर देऊन समाजातील समस्या सोडवण्यावर कार्य केले पाहिजे. सध्या कुपोषणाचा प्रश्न सर्व स्तरांत भेडसावत आहे. आदिवासी पाड्यावर कुपोषणाची परिस्थिती बिकट आहे. विद्यापीठाने यावर तोडगा काढला पाहिजे. अंतराळातील ग्रहांवर आज आपण पोहोचलो आहोत. हवामानातील बदल आणि समुद्र सपाटीची वाढलेली पातळी यासारखी प्रमुख आव्हाने आपल्यासमोर आहेत. यावर अभ्यास करून उपाययोजना आखल्या पाहिजेत.

डॉ. स्वामीनाथन यांना गेल्या ५० वर्षांपासून मी ओळखतो. त्यांनी भारतीय शेती क्षेत्रात क्रांती केली. गेल्या ६५ वर्षांपासून त्यांनी शेती क्षेत्रात संशोधनपर कार्य केले आहे.
- राष्ट्रपती

Web Title: Do not intimidate universities - President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.