केवळ मंत्रालय नको तर ओबीसींसाठी निधीही द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 03:03 AM2017-02-28T03:03:19+5:302017-02-28T03:03:19+5:30
ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही
अनगाव : ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात कृतीत आणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी केंद्र व राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कुणबी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. न्याय मिळण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.
पालखने कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज क्रीडानगरीत कुणबी आध्यात्मिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतमालाला बाजारभाव नाही. भातखरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करतोय, असे ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. जोवर मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी महिनाभर मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरावा, असे ठाकरे यांनी सांगितले. येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार किसन कथोरे, गोटीराम पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, रवींद्र घोडविंदे, विद्या वेखंडे, सुरेश टावरे, योगिता धानके, शोएब गुड्डू, शंकर खाडे, अरु ण पानसरे, किसन तारमळे, शरद पाटील, ज्ञानेश महाराज उपस्थित होते. उदय पाटील, काशिनाथ तिवरे, महेश धानके, विकास जाधव, युवराज पाटील, प्रकाश भोईर, विष्णू चंदे, भगवान सांबरे, अजय पाटील, युवराज पाटील, मनोहर ठाकरे, राजूभाऊ चौधरी, तुकाराम पष्टे आदी पदाधिकाऱ्यांचे समाजबांधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)
>संमेलनातून दिशा मिळावी
अनगाव : कुणबी समाजाला इतिहास समजावा, यासाठी संमेलने होणे गरजेचे आहे. ती समाजाला ज्ञानाची, विचारांची दिशा देणारी असावी. ही संमेलने दिशादर्शक हवी, अन्यथा केवळ जेवणावळीपुरतीच ती उरतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जेमिनी कडू यांनी व्यकत केले.