...आई गर्भात मारू नको! : विद्यार्थ्यांची आर्त हाक

By Admin | Published: June 3, 2016 12:33 AM2016-06-03T00:33:51+5:302016-06-03T00:33:51+5:30

काय दोष माझा गं आई गर्भात मारू नको, संस्कृतीचा मूलाधार स्त्रीच करी राष्ट्राचा उद्धार, मुलगा कुळाचा दिवा मुलगी दिव्याची वात, तुझ्याहून थोर जगी दुसरा कुणी नाय

Do not kill mother in the womb! : Student's call | ...आई गर्भात मारू नको! : विद्यार्थ्यांची आर्त हाक

...आई गर्भात मारू नको! : विद्यार्थ्यांची आर्त हाक

googlenewsNext

सुवर्णा नवले,  पिंपरी
काय दोष माझा गं आई गर्भात मारू नको, संस्कृतीचा मूलाधार स्त्रीच करी राष्ट्राचा उद्धार, मुलगा कुळाचा दिवा मुलगी दिव्याची वात, तुझ्याहून थोर जगी दुसरा कुणी नाय, असे उद्बोधनपर १५०हून अधिक पोवाडे सादर करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. झोपडपट्टीतील बालशाहिरांनी स्वरचित पोवाडा पथकाची निर्मिती करून समाजात संस्कृती व जनजागृती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई, संगमनेर, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी जाऊन सादर केले आहेत.
बालशाहिरांच्या पथकामुळे शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तेथील नागरिकांचा तयार झाला आहे. शाळेच्या पटसंख्येतही सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाढ झाल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र आहेर यांनी सांगितले.
डोक्यावर फेटा, हातात शाहिरी डफ, दिमडी आणि टाळ-मृदंगाची साथ जेव्हा डफडीवर पडते, तेव्हा अंगात एक वेगळाच संचार होऊन प्रेक्षकांचे मन पोवाड्यातून हेलावून जाते. त्यामध्ये भाटनगर आणि बौद्धनगर भागातील विजय कापसे, अमर म्हस्के, ओंकार चंदगडकर हे ढोलकीवादक व गायक आहेत, तर कोरस देणारे ऋतीक धार्इंजे, संतोष कापसे, आर्यन वाघमारे, स्वप्निल गायकवाड, स्वप्निल पवार, अर्जुन सनी भाट व थेरगाव शाळेतील अभिषेक क्षीरसागर, आर्य शेवाळे, सूरज कांबळे, गणेश भांडवलकर, प्रथमेश थोरात, हृषीकेश मुतिरावे, नीतिकेश थोरात, रोहन लांघी, अमित शिंदे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
शिवनेरी ते रायगड अशी दर वर्षी पोवाड्यातून पायी जनजागृती करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सूरज कांबळे व आर्य शेवाळे या विद्यार्थ्यांनी अवघ्या १४व्या वर्षी अण्णा भाऊ साठे व शिवरायांवर स्वरचित पोवाडे तयार केले आहेत. तर अर्जुन नेटके हे संगीतकार म्हणून साहाय्य करतात. शाळेत कोणाचाही वाढदिवस असेल, तर तो पोवाडा गाऊनच वाढदिवस सादर केला जातो.
सुरुवातीला ढोलकी वाजविण्याची आवड होती. आवडीचा उपयोग पोवाडा वाजविण्यासाठी झाला. शिवाजीमहाराज काय आणि कसे हे आम्ही पोवाड्यातून गाऊन दाखविले आहे. अजूनही खरा इतिहास कोणाला माहिती नाही. जनजागृती करण्याचे काम करीत आहोत.
- विजय कापसे, भाटनगर
मी आता दहावीला गेलो आहे. चौथीपासून ही कला अंगी बाणवली आहे. पोवाडा सादर करत असतो तेव्हा खूप आनंद वाटतो. पोवाड्याची परंपरा आम्हाला जोपासायची आहे. नागरिकांपर्यंत पोवाड्याच्या माध्यमातून चांगले संदेश व संस्कार पोहोचवायचे आहेत. मी गायक आणि वादकही आहे.
- ओंकार चंदगडकर, आंबेडकर कॉलनी, भाटनगर
मी आठवीमध्ये आहे. सध्या पोवाडा आणि डफ वाजवतो. यामधून खूप आनंद आणि उत्साह मिळतो. प्रेक्षक आमचे खूप कौतुक करतात. त्यानिमित्त विविध गड-किल्ल्यांवर भटकंती क रता येते. मोठा इतिहास यामधून समोर येतो. सर्वांचा पाठिंबा यासाठी आम्हाला मिळतो.
- रोहन लांघी, इंद्रायणीनगर

Web Title: Do not kill mother in the womb! : Student's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.