दुहेरी खुनाचा तिसऱ्या दिवशीही नाही सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 01:01 AM2017-04-06T01:01:36+5:302017-04-06T01:01:36+5:30
आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट येथील डोंगरावर रविवारी रात्री झालेल्या महाविद्यालयीन युवक-युवती यांच्या दुहेरी खुनाचा तपास वेगात सुरू आहे.
लोणावळा : आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट येथील डोंगरावर रविवारी रात्री झालेल्या महाविद्यालयीन युवक-युवती यांच्या दुहेरी खुनाचा तपास वेगात सुरू आहे. कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांची कसून चौकशी सुरू असली तरी तिसऱ्या दिवशीही पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळालेले नाहीत.
लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी खुनाचा तपास तांत्रिक मुद्दयावर सुरू केला आहे. बुधवारी लोणावळा उपविभागीय अधिकारी डी. डी. शिवथारे यांचे पथक व स्थानिक पोलीस गुन्हे पथकाने सिंहगड महाविद्यालयाचे प्रशासन व मयत युवक व युवती यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी तसेच अन्य विद्यार्थ्यांकडे कसून चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरील डाटा तपासण्यात आला. मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी केली. त्याठिकाणी काही आढळून येते का? याची पाहणी केली.
सिंहगड महाविद्यालयात तंत्र अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा सार्थक वाकचौरे व संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी श्रुती डुंबरे या दोघांचा डोक्यात व शरीरावर वार करून रात्री निर्घृन खून करण्यात आला. रविवारी ही घटना घडली मात्र सोमवारी दुपारी घटना उघडकीस आली. सर्व शक्यतांचा अंदाज बांधत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथके तयार केली आहेत. या घटनेचा सर्व अंगानी तपास सुरूकेला आहे. या मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी, मयत युवक- युवतीच्या मित्र-मैत्रिणींकडून व संबंधितांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
>तिसऱ्या दिवशीही महाविद्यालय बंद
खुनाच्या घटनेनंतर लोणावळा परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिंनीमध्ये घबराट पसरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या दिवशी महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. असे महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. काही विद्यार्थ्यांची भेट घेऊन पोलीस माहिती घेत आहेत. काहींचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
लवकरच प्रकरणाचा उलगडा
रविवारी सायंकाळपासून श्रुती ही होस्टेलमध्ये नव्हती. ती कुठे व कशासाठी होस्टेलबाहेर गेली होती? याबाबत तिने व्यवस्थापनाला काही माहिती दिली होती का? घरातील कोणाशी तिचे याबाबत बोलणे झाले होते का? सार्थकने बाहेर जात असल्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना कोणाला काही सांगितले होते का? पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असावी का? प्रकरणातील काही महत्त्वाच्या मुद्दयाच्या आधारे तपास सुरूअसून लवकरच प्रकरणाचा उलगडा करू असे पोलीस अधिकारी सांगत आहेत.