संविधानाला हात लावू देणार नाही!
By admin | Published: April 4, 2016 03:15 AM2016-04-04T03:15:36+5:302016-04-04T03:15:36+5:30
भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे
कमलेश वानखेडे, नागपूर
भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने ‘एक शपथ... संविधानाला हात लावू देणार नाही!’ अशी आक्रमक ‘थीम’ तयार केली असून ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, असाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
सत्तास्थापनेनंतर भाजपा नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करण्याबाबत केलेले वक्तव्य याचे पडसाद बिहारच्या निवडणूक निकालात उमटले आणि भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आरक्षण लागू राहील, असे स्पष्ट केले. पण हा वाद शांत होत नाही तोच रोहित वेमुला प्रकरण समोर आले. यावरून देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण, राज्यघटना या मुद्यांवर भाजपा, संघ परिवार ‘बॅकफूट’वर गेला असल्याचा अंदाज काँग्रेसने बांधला आहे. ही संधी साधत दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेसने १९९९-२००० साली देशभर संविधान बचाव रॅली काढल्या. या रॅलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक’ केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा तशीच तयारी चालविली आहे.