आरेत बांधकाम करू देणार नाही
By admin | Published: February 24, 2015 04:32 AM2015-02-24T04:32:09+5:302015-02-24T04:32:09+5:30
बृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे कॉलनीच्या जमिनीवर विविध बांधकामे करण्याचा प्रस्ताव असला तरी एक इंच जमिनीवरही बांधकाम करू देणार नाही
मुंबई : बृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे कॉलनीच्या जमिनीवर विविध बांधकामे करण्याचा प्रस्ताव असला तरी एक इंच जमिनीवरही बांधकाम करू देणार नाही, अशी तंबी दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी महापालिकेला दिली. आरेची जमीन ही ‘ना विकास क्षेत्र’ असल्याची अधिसूचना जारी केली असल्याने बांधकाम करण्यास परवानगी देणार नाही, अशी पुस्ती खडसे यांनी जोडली.
खडसे म्हणाले की, आरेच्या ४०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. सध्या येथील जमिनीवर ३ हजार झोपड्या आहेत. त्यापैकी ४०० झोपड्या कारवाईत पाडून टाकल्या.
रॉयल पाम्सने केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांनी कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. १९९४मध्ये आरे कॉलनीची हिरवळ ‘ना विकास क्षेत्रात’ समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली होती. ती पुनरुज्जीवीत केली असल्याने भविष्यात तेथे कुठलेही बांधकाम होऊ दिले जाणार नाही. (विशेष प्रतिनिधी)