डोक्यात सत्तेची मस्ती आणू नका
By admin | Published: May 25, 2015 03:12 AM2015-05-25T03:12:54+5:302015-05-25T03:12:54+5:30
डोक्यात सत्तेची मस्ती गेल्यासारखे वागू नका. जनता मोठा न्यायाधीश आहे. ती तुम्हाला पाहतेय. तिला जास्तीत जास्त वेळ द्या, या शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
यदु जोशी, कोल्हापूर
डोक्यात सत्तेची मस्ती गेल्यासारखे वागू नका. जनता मोठा न्यायाधीश आहे. ती तुम्हाला पाहतेय. तिला जास्तीत जास्त वेळ द्या, या शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी राज्यातील मंत्र्यांना सुनावले. सामान्य माणूस, पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना भेटण्याचे वेळापत्रक बनवा, असेही त्यांनी बजावले आणि आपण यापुढे मंत्र्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेऊ, असेही सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या मंत्र्यांची बैठक शहा यांनी शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात सुमारे अडीच तास घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्व मंत्री या बैठकीला हजर होते. शहा यांनी महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’ आणण्याचे आदेश दिले.
तिथे मंत्र्यांनी नागरिकांना भेटण्याचे, आमदारांशी चर्चा करण्याचे तसेच मंत्रालयात द्यावयाच्या वेळेबाबतचा कार्यक्रम आधीच तयार असतो आणि त्याची पक्षाला पूर्वकल्पना असते, असे ते म्हणाले. तुम्ही कामे करता; पण ती जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
सहा महिने झाले तरी सत्तेतील समन्वय अद्याप दिसत नाही. महत्त्वाच्या व संवेदनशील विषयांवर बऱ्याचदा मंत्र्यांमध्ये ताळमेळ न राहिल्याने मतभिन्नता समोर येते, हे चांगले लक्षण नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळे आहात, म्हणून लोकांनी तुम्हांला निवडून दिले आहे, हे लक्षात ठेवून काम करा आणि कामातील वेगळेपण दाखवा, असेही शहा यांनी सुनावले.
मंत्री आम्हाला भेटत नाहीत, अशी आमदारांची तक्रार आहे आणि ती दूर करण्याची जबाबदारी केवळ तुमची आणि तुमचीच आहे, अशी तंबीही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.